kolhapur: पुरणपोळी खाल्ली; परंतु विजयाचा गोडवा चाखला नाही; आवाडे-माने मनोमिलनाचा अनुभव जुना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 04:56 PM2024-04-17T16:56:58+5:302024-04-17T16:57:40+5:30
फडणवीस यांना त्रास नको..
अतुल आंबी
इचलकरंजी : पारंपरिक विरोधक असलेल्या माने-आवाडे यांच्यात समेट घडवत वरिष्ठांनी सूत जुळवले. पंधरा वर्षांपूर्वी २००९ च्या निवडणुकीत निवेदिता माने आणि आवाडे यांच्यात असाच समेट घडला होता. त्यावेळी दोघांनी पुरणपोळी खाऊन आम्ही एक झालो, असा संदेश जरूर दिला; परंतु प्रत्यक्षात त्या निवडणुकीत निवेदिता माने यांचा राजू शेट्टींकडून पराभव झाला. माने गटाला विजयाचा गोडवा चाखता आला नाही. या जुन्या आठवणींची इचलकरंजीकरांना मंगळवारी पुन्हा आठवण झाली. निमित्त होते प्रकाश आवाडे यांच्या निवडणुकीतील माघारीचे.
गेल्या पाच वर्षांतील दोघांत झालेली धुसफूस पाहता यंदा प्रत्यक्षात मनोमिलन होणार का, याकडे आता मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. माने आणि आवाडे घराण्यात पारंपरिक राजकीय संघर्ष आहे. त्यात १५ वर्षांपूर्वी सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत निवेदिता माने यांच्याविरोधात राहुल आवाडे यांनी पहिल्यांदाच लोकसभा लढविण्याची घोषणा केली. त्यानिमित्ताने खासदारकीचा मतदारसंघ पिंजून काढत जुन्या गटांना सक्रिय करण्यास सुरुवात केली;
परंतु त्यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे यांची काँग्रेसबद्दलची एकनिष्ठता असल्याने वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर राहुल यांना शांत करण्यात आले आणि माने-आवाडे या दोघांच्यात समेट घडविण्यात आला. त्यावेळी गुढीपाडव्यानिमित्ताने आवाडे यांच्या बंगल्यावर पुरणपोळीचे जेवण करून आम्ही एकत्र झालो असल्याचे जाहीर केले. निवेदिता माने यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले; परंतु प्रत्यक्षात तसे फारसे घडले नाही.
या निवडणुकीतही राहुल आवाडे यांनी लोकसभेची तयारी सुरू केली. सुरुवातीला भाजपकडून उमेदवारी मिळेल, या आशेवर जोरदार काम सुरू झाले; परंतु माने यांची उमेदवारी कायम राहिली आणि राहुल यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे त्यांनी उमेदवारीसाठी उद्धवसेनेची चाचपणी केली. त्यातूनही काही होत नसल्याचे पाहून अखेर अपक्षाचा नारा दिला. या बंडाला धार यावी, यासाठी राहुल यांचे नाव बाजूला करत आमदार प्रकाश आवाडे यांचे नाव पुढे आणले आणि ताकद दाखवून दिली.
आवाडेंच्या उमेदवारीमुळे धैर्यशील यांना धोका निर्माण होणार, हे जाणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फिल्डिंग लावली. दोन बैठका आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून फोन करून आवाडेंचे बंड थंड केले. त्यानंतर इचलकरंजी मतदारसंघात सर्व जुन्या चर्चांना नव्याने सुरुवात झाली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दोघांतील मनोमिलन खासदार माने यांना विजयापर्यंत कसे नेते, याकडे लक्ष लागले आहे.
फडणवीस यांना त्रास नको..
आवाडेंच्या बंडखोरीमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव येत असल्याने त्यांची अडचण होऊ नये, यासाठी माघार घेतल्याचे आवाडे गोटातून सांगण्यात आले.
संघर्ष कशामुळे?
इचलकरंजीतील कृष्णा पाणीपुरवठा योजनेची पाच किलोमीटरची पाइपलाइन बदलणे, सहा जलकुंभांची उभारणी, शंभर कोटींचे रस्ते अशा कामांमध्ये माने यांच्याकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप आमदार आवाडे यांनी नाव न घेता केला होता. त्यातून दोघांतील संघर्ष वाढला.