कोडोलीतील सोनोग्राफी मशीनची कोल्हापुरातच खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 11:14 AM2020-12-22T11:14:19+5:302020-12-22T11:16:17+5:30
Crimenews Kolhapur-पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील मातृसेवा रुग्णालयामध्ये बसवण्यात आलेले बेकायदेशीर सोनाग्राफी मशीनची खरेदी कोल्हापुरातच करण्यात आल्याचे तपासातून पुढे आले आहे.
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील मातृसेवा रुग्णालयामध्ये बसवण्यात आलेले बेकायदेशीर सोनाग्राफी मशीनची खरेदी कोल्हापुरातच करण्यात आल्याचे तपासातून पुढे आले आहे.
त्यातील तथ्य पडताळून पाहिल्यानंतर ज्यांनी हे मशीन विकले आहे. त्यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. हा गुन्हा थेट न्यायालयातच दाखल केला जातो, त्याची कागदपत्रे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोडोली येथील डॉ. अरविंद कांबळे यांच्या मातृसेवा रुग्णालयावर छापा टाकून गर्भलिंग निदान होत असल्याचे उघडकीस आणण्यात आले होते. त्यानंतर एक सोनोग्राफी मशीन सील असताना दुसरे मशीन आणून हा कारभार सुरू होता.
कांबळे याने कोल्हापुरातूनच हे मशीन घेतल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता कोल्हापुरातील संबंधित मशीनची विक्री करणाऱ्यांची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधितांचेही जबाब घेण्यात आले असून मशीन विक्रीची खातरजमा करण्यात येणार आहे.
खात्री झाल्यानंतर संबंधितांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो. एकूणच न्यायालयात हे प्रकरण दाखल करण्यापूर्वी सर्व बाजूंनी केस मजबूत करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि जबाबाची प्रक्रिया सुरू आहे.