‘गोकुळ’ कर्मचाऱ्यांचा ‘काम बंद’चा पवित्रा
By admin | Published: January 29, 2015 12:25 AM2015-01-29T00:25:19+5:302015-01-29T00:33:02+5:30
एम.डीं.चा निषेध : कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’चा इशारा दिला आहे. संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी चर्चेसाठी गेलेल्या कर्मचारी युनियनच्या प्रतिनिधींना अपमानास्पद भाषा वापरत केबिनमधून हाकलल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी घाणेकर यांच्या विरोधात आज घोषणा बाजी केली.
‘गोकुळ’ कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत संचालक मंडळाने महिन्यापूर्वी निर्णय घेतला होता. सरासरी २१०० रुपये पगारवाढ कर्मचाऱ्यांना दिली होती. याबाबत चर्चा करण्यासाठी आज युनियनचे प्रतिनिधी सदाशिव निकम हे सहकाऱ्यांसमवेत कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी हा प्रकार घडला.
‘गोकुळ’साठी ३९ ठराव दाखल
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) आज, बुधवारी ३९ ठराव दाखल झाले. सर्वाधिक करवीर तालुक्यातून १६ ठराव दाखल झाले असून आजअखेर १०३ ठराव दाखल झाले आहेत. तालुकानिहाय आज दाखल झालेले ठराव असे- करवीर- १६, चंदगड -२, भुदरगड -३, गडहिंग्लज- ५, हातकणंगले -१, शाहूवाडी-१, गगनबावडा -७, राधानगरी -२.
‘गोकुळ’मध्ये आज अशा प्रकारची काहीच घटना घडलेली नाही, कोणाशी वादही झालेला नाही तर प्रतिक्रिया काय द्यायची ? - डी. व्ही. घाणेकर
(कार्यकारी संचालक, ‘गोकुळ)
‘त्या’ सुपरवायझरवर होणार कारवाई
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्तारूढ संचालकांचे ठराव गोळा करणाऱ्या संघाच्या सुपरवायझर व अन्य कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी दिले. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी त्यासंबंधीची लेखी तक्रार सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे केली होती.
संघाचे काही संचालक हे संघाचे कर्मचारी कमी व संचालकांचे कार्यकर्ते म्हणूनच राबत असतात. त्यांचा दूध संस्थेशी दैनंदिन संबंध असतो. त्यामुळे आपल्या संचालकास मदत करू शकेल अशाच व्यक्तीच्या नावे दूध संस्थेचा ठराव व्हावा यासाठी सुपरवायझर प्रयत्न करतात. त्यासाठी काहीवेळा दहशतही दाखवली जाते तसाच प्रकार सध्या सुरू असल्याने विरोधी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी त्यासंबंधीची तक्रार सहकार आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेऊन संघाच्या प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला आहे.
त्यासंबंधी घाणेकर यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘गोकुळ’ची निवडणूक पारदर्शी वातावरणात व्हावी यासाठी या संस्थेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा प्रत्यक्ष निवडणुकीत सहभाग असता कामा नये, अशा सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. आज सहकार आयुक्तांनीही फोन करून एकाही व्यक्तीची निवडणूक प्रक्रियेबद्दल तक्रार येता कामा नये याची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या.