kolhapur: देवठाणे मठात भाविकांच्या अडचणींवर पौर्णिमेला दरबार; गोशाळेत गायींचा मृत्यू, कारभार आला संशयाच्या भोवऱ्यात
By उद्धव गोडसे | Published: April 13, 2024 11:53 AM2024-04-13T11:53:04+5:302024-04-13T11:53:24+5:30
गोशाळेच्या नावाखाली भाविकांकडून लाखो रुपये उकळले
उद्धव गोडसे
कोल्हापूर : भाविकांच्या जीवनातील अडचणी सोडवण्याचा दावा करणारे श्री बाळकृष्ण महाराज यांनी देवठाणे येथे सुरू केलेल्या मठाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मठात सुरू केलेल्या गोशाळेच्या नावाखाली त्यांनी भाविकांकडून लाखो रुपये उकळले. मात्र, गायींच्या मृत्यूमुळे ती बंद पडली. मठाचे उत्पन्न किती, त्याचे काय केले जाते, राज्यात आणखी कुठे मठाच्या नावाखाली माया जमवली आहे काय? याचे गौडबंगाल वाढले आहे.
नावातच देवाचे स्थानक असलेल्या देवठाणे गावाची निवड करून बाळकृष्ण महाराजांच्या वडिलांनी परिसरातील ग्रामस्थांवर भुरळ घातली. आपल्या मुलांमध्ये दैवी शक्ती असल्याच्या भूलथापा मारून त्यांनी मंदिर आणि मठाची कल्पना ग्रामस्थांच्या डोक्यात घातली. गोड बोलून दोन एकर जमीन मिळवली. २००३ मध्ये श्री स्वामी समर्थांच्या मंदिराची उभारणी केली. त्यानंतर दोन-तीन वर्षांनी मठाचे बांधकाम सुरू केले.
या मठात दर पौर्णिमेला महाराज भक्तांना दर्शन देतात, त्यांच्या जीवनातील अडीअडचणी सोडवण्यासाठी कागदावर प्रश्न लिहून घेतात, त्यानंतर भक्तांना काही उपाययोजना सांगितल्या जातात. यासाठी सेवा मूल्य १०१ रुपये असल्याची सूचना मठात लिहिली असली तरी, भाविक स्वेच्छेने हजारो रुपये दानपेटीत टाकतात. पौर्णिमेनंतर महाराज मठातून बाहेर पडून गावोगावच्या भक्तांंकडे राहतात. त्यांच्याकडून मठासाठी लाखो रुपयांच्या देणग्या मिळवतात, अशी माहिती गावातून मिळाली.
पुणे आणि सांगली जिल्ह्यातील काही भक्तांनी मठातील सभामंडप आणि हॉलचे बांधकाम करून दिले. हॉल आणि निवासस्थानाच्या बांधकामासाठी महाराजांनी दोन शेतकऱ्यांकडून पाच गुंठे जमीन घेतली. भाविकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी मठात गोशाळा सुरू केली. गोशाळेच्या नावाखाली अनेक भाविकांकडून पैसे उकळल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, योग्य देखभालीअभावी काही वर्षांतच तीन-चार गायी दगावल्या. त्यानंतर गोशाळा बंद केली.
मठाची व्यवस्था पाहण्यासाठी इचलकरंजी येथील संतोष आडसुळे आणि त्याच्या पत्नीची नियुक्ती केली होती. अलीकडे हेच दाम्पत्य मठाचा कारभार पाहत होते. इतर सेवकांचीही अधूनमधून वर्दळ असे. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मठातील गैरकारभार स्थानिकांच्या फारसा नजरेत येत नव्हता. आता मात्र महाराजांचे कारनामे समोर येत असल्याने परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
वकिलाच्या कार्यालयात दर्शन दरबार
कोल्हापुरात पापाची तिकटी परिसरातील एका वकिलाच्या कार्यालयात बाळकृष्ण महाराज भक्तांना दर्शन देत होते. अनेकदा त्यांचा दर्शन दरबार भरल्याची माहिती काही भाविकांनी दिली. शनिवार पेठेतील एका महिलेचे लाखो रुपये त्याने हडप केल्याचीही चर्चा सुरू आहे.
तपश्चर्या की बनाव?
ऑगस्ट २०१३ ते मार्च २०१५ या काळात महाराज तपश्चर्येसाठी बाहेर गेले होते, असे त्यांच्या भक्तांकडून सांगितले जाते. मात्र, ते नेमके कुठे गेले होते, याबाबत कोणीच काही सांगत नाही. ते अंतर्धान पावले आणि प्रकट झाले, एवढेच सांगितले जाते. तपश्चर्येला जाण्यापूर्वी आणि तपश्चर्या करून आल्यानंतरचे दोन फोटो मठात लावले आहेत. याबाबत माहिती लपवण्याचा प्रयत्न होत असल्याने संशय बळावला आहे.