आयुर्वेदाचे प्रयोजन

By Admin | Published: January 7, 2017 01:08 AM2017-01-07T01:08:29+5:302017-01-07T01:08:29+5:30

आयुर्वेदाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, त्याने काही मूलभूत सिद्धांत दिले आहेत. ते वापरून तुम्ही नवीन रोगांवरही उपचार करू शकता.

Purpose of Ayurveda | आयुर्वेदाचे प्रयोजन

आयुर्वेदाचे प्रयोजन

googlenewsNext

आजज चर्चेला सर्वजण हजर होते. आयुर्वेद शिकणारे अनेक विद्यार्थी शंका समाधानासाठी येत. आजपासून त्यांनी एकत्रितपणेच चर्चेला बसायचे ठरविले.सर्वजण आलेले पाहून बिपिनने प्रश्न केला की, ‘सर, आज जगात सर्वत्र आयुर्वेदाचे वारे वाहू लागले आहेत; पण आज इतकी वर्षे ‘आयुर्वेद’ भारतातच का राहिला? त्याचा प्रसार का झाला नाही? आयुर्वेदाचे मूळ तत्त्व काय?
जशी ज्ञानेश्वरी लिहिताना ज्ञानेश्वरांनी स्वत:ची परंपरा साक्षात शंकराकडून सुरू होते, असे सांगितले. तसेच आयुर्वेदाची परंपरा ही ब्रह्मदेवापासून सुरू होते. तिथून पुढे प्रज्ञापती-अश्विनीकुमार-इंद्र अशी ती आली आहे. सुरुवातीला या पृथ्वीवर फारशी रोगराई नसावी. त्यामुळे लोकांना औषधांची गरज पडली नाही. पुढे इथे रोगराई सुरू झाल्यावर ऋषींना ते बरे करण्याची आवश्यकता भासू लागली. म्हणून त्यांनी पुनर्वसू आत्रेयांना आपला नेता बनवून हे ज्ञान प्राप्त केले. (यावरून त्याकाळी ज्ञानार्जनासाठी देश सोडून जाण्याची पद्धत असावी.) पुढे अग्निवेश, आदी ऋषींनी आत्रेयांपासून ज्ञान प्राप्त करून आपापले ग्रंथ लिहिले. आज काळाच्या ओघात परकीय आक्रमणांनी त्यातील अनेक ग्रंथ नष्ट झाले.
प्रत्येक गोष्टीला पुढे जाण्यासाठी दोन गोष्टींची जरुरी असते. एक लोकाश्रय दुसरा राजाश्रय. हे पुरेसे मिळाले तरच एखादी कला, शास्त्र पुढे जाऊ शकते. परकियांच्या राजवटीत हे अशक्य असते.
आयुर्वेद हा इतर शास्त्रांपेक्षा फार वेगळा आहे. त्यांचे वैशिष्ट्य जर कशात असेल, तर ते रोगांचा विचार करण्यात. रोग झाल्यावर बरे करण्यासाठी अनेक औषधोपचार पद्धती आहेत; पण कसे वागल्यावर रोग होणारच नाहीत किंवा झाले तरी त्याचे परिणाम तीव्र होणार नाहीत, असे सांगणारे ‘आयुर्वेद’ हे बहुधा जगातील पहिले आणि एकमेव शास्त्र आहे. वाहतुकीचे जसे नियम असतात आणि जर ते पाळले तर अपघात कमी होतात, तसेच इथे आहे. आरोग्याचे काही नियम आहेत आणि ते पाळले तर आजारपणांची संख्या निश्चितच कमी होते.
आता आपल्याला दिवसभर कसे वागायचे हे जसे माहीत पाहिजे. तसे ऋतुमान बदलत असताना काय करायला हवे, हे ही माहीत पाहिजे. सरळ रस्त्यावर असणारा गाडीचा वेग आपण वळण झाल्यावर कमी करतो. नाहीतर अपघात होईल, हे माहीत असते. तसेच ऋतुमानाप्रमाणे दिनचर्या बदलायला हवी, हे ही माहीत हवे. नाहीतर आजारपण ठरलेलेच !
आजकाल अनेकांना प्रश्न पडतो की, आम्हाला काही होत नाही, मग आम्हाला औषध कशाला? आपले शरीर, मन इतके संवेदनशील नसते की प्रत्येक पुढे होणाऱ्या आजारांची कल्पना आपणास आधी येत नाही; परंतु एखादा आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य सर्वांगीण परीक्षा करून बऱ्याचवेळा पुढे होणाऱ्या आजारांची कल्पना रुग्णाला देऊ शकतो, अशाप्रकारे जे रुग्ण नाहीत, त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि जे आजारी पडलेत त्यांना चिकित्सा (औषधोपचार) देऊन बरे करणे, अशी दुहेरी भूमिका आयुर्वेद निभावत असतो.आयुर्वेदाच्या बाबतीत अनेकांना आणखी एक शंका येते ती म्हणजे, आजकाल दिसणारे रोग आयुर्वेदात कुठे वर्णन केले आहेत? आयुर्वेदाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, त्याने काही मूलभूत सिद्धांत दिले आहेत. ते वापरून तुम्ही नवीन रोगांवरही उपचार करू शकता. ते कसे, ते आपल्या पुढच्या चर्चेत कळेलच. उद्या पुन्हा नवीन शंका घेऊन मुले येतील. तोपर्यंत आजची चर्चा इथेच थांबवू.---- - डॉ. विवेक हळदवणेकर

(डॉ. विवेक हळदवणेकर हे प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ आहेत)

Web Title: Purpose of Ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.