‘सारथी’च्या पहिल्या बातमीपासून ‘लोकमत’चा पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:19 AM2021-06-26T04:19:00+5:302021-06-26T04:19:00+5:30
महाराष्ट्रात सन २०१६ मध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघाले. वातावरण तापले होते. अशातच १५ ऑक्टोबर २०१६ रोजी कोल्हापुरात अतिप्रचंड असा ...
महाराष्ट्रात सन २०१६ मध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघाले. वातावरण तापले होते. अशातच १५ ऑक्टोबर २०१६ रोजी कोल्हापुरात अतिप्रचंड असा मोर्चा निघाला. महाराष्ट्र शासन नेमका काय निर्णय घेणार याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. राजकीय आणि सामाजिक पातळीवर महाराष्ट्रात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते.
अशातच ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला एक माहिती मिळाली. ‘बार्टी’ या संस्थेच्या धर्तीवर शासन मराठा समाजातील युवक-युवतींसाठी प्रशिक्षण देणारी मोठी संस्था उभारणार आहे. या माहितीची खात्री केल्यानंतर दि. १७ ऑक्टोबर २०१६ रोजी ‘लोकमत’च्या महाराष्ट्रातील सर्व आवृत्त्यांच्या पहिल्या पानावर ‘आरक्षणाच्या मागणीवर प्रशिक्षण संस्थेचा उतारा’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०१६ मध्ये नागपूर अधिवेशनामध्ये अशाप्रकारची संस्था शासन स्थापन करणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आणि ‘लोकमत’च्या बातमीवर शिक्कामोर्तब केले.
त्यानंतर सातत्याने ‘सारथी’साठीची जागा, कार्यालय, पदभरती, निधी या सगळ्यांबाबतील ‘लोकमत’ने पाठपुरावा सुरू ठेवला आणि आज कोल्हापूरमध्ये या उपकेंद्राचे उद्घाटन होत आहे.
चौकट
शाहू महाराजांचे नाव देण्याची केली होती मागणी
‘लोकमत’ने १७ ऑक्टोबर २०१६ रोजीच्या पहिल्याच बातमीत या संस्थेला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्याची मागणी केली होती. तत्कालिन युती सरकारने हाच निर्णय घेत या संस्थेचे ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ असे नामकरण केले आणि ‘लोकमत’ची मागणी मंजूर केली.