मेकर ग्रुपच्या पुरुषोत्तम हसबनीस याला अटक; आर्थिक गुन्हे शाखेची माहिती : करवीर व इचलकरंजी प्रांतांना बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:24 AM2020-12-22T04:24:50+5:302020-12-22T04:24:50+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीसहित पश्चिम महाराष्ट्रात कृषी आधारित व इतर वेगवेगळ्या आकर्षक योजना काढून गुंतवणुकीस निमंत्रण देऊन हजारो सामान्य ...
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीसहित पश्चिम महाराष्ट्रात कृषी आधारित व इतर वेगवेगळ्या आकर्षक योजना काढून गुंतवणुकीस निमंत्रण देऊन हजारो सामान्य लोकांना सुमारे ५० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मेकर ग्रुपच्या चालकांपैकी कोल्हापुरातील पुरुषोत्तम हसबनीस यास अटक केल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास अधिकाऱ्यामार्फत सोमवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. संजय दुर्गे व इतर गुंतवणूकदारांनी केलेल्या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयात झाली.
कंपनीची मालमत्ता जप्त करण्याची पुढील कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर, करवीर प्रांत व इचलकरंजी प्रांत अधिकारी यांना प्रतिवादी करून त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायाधीश एस. एस. शिंदे व एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने दिले. तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश देत सुनावणी २१ जानेवारीपर्यंत तहकूब केली.
ॲड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत दुर्गे व इतर गुंतवणूकदारांनी याचिका दाखल केली आहे. नवीन पोलीस निरीक्षक एस. एम. यादव यांनी नुकताच या गुन्ह्याचा तपास हाती घेतला. त्यामुळे न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिली होती. सोमवारी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक यादव हजर होते. त्यांनी तपासाचा अहवाल न्यायालयात सादर केला. यावेळी याचिकाकर्त्यातर्फे ॲड. धैर्यशील सुतार यांनी या आर्थिक गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, कोल्हापूर व सांगली परिसरातच सुमारे ५० कोटी रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याचे सांगितले. सध्या फक्त तीन मालमत्ता जप्त केल्या आहेत; परंतु अद्याप संचालक व संबंधितांची बँक खाती जप्त केली नसल्याचे ॲड. सुतार यांनी निदर्शनास आणून दिले.
कोल्हापूर जिल्ह्यातून मेकर कंपनी नावाच्या खासगी कंपनीने शेती व इतर बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक असल्याचे आमिष दाखवून हजारो सामान्य लोकांकडून सुमारे ५६ कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या व नंतर कंपनीने केलेल्या सर्व गुंतवणुकीच्या योजना या अवास्तव व बोगस असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे संजय केरबा दुर्गे व इतर ९४ ठेवीदारांनी कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात ८ डिसेंबर २०१८ ला फिर्याद दिली.