सातारामधील पुसेसावळीच्या दंगलीला भाजपचे बळ, MIM ने केला घणाघाती आरोप
By पोपट केशव पवार | Published: September 18, 2023 03:43 PM2023-09-18T15:43:51+5:302023-09-18T15:44:20+5:30
साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा
पोपट पवार, कोल्हापूर: पुसेसावळी (ता.खटाव, जि.सातारा) येथे झालेल्या दंगलीला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनीच चितावणी दिली असून सातारा जिल्ह्याचे पाेलीस अधीक्षक यांनी कर्तव्यात कसुर केल्याने त्यांच्यासह संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करा अशी मागणी ऑल इंडिया मजलीस ए इतेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) संघटनेने कोल्हापुर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे कोल्हापुरात सोमवारी केली. पोलीस महानिरीक्षकांना निवेदन दिल्यानंतर एमआयएमचे राज्य कार्याध्यक्ष अब्दुल गफर कादरी यांच्यासह शिष्टमंडळाने पत्रकारांशी संवाद साधला.
कादरी म्हणाले, पुसेसावळीत १८ ऑगस्टला एका युवकाने इन्स्टाग्रामला आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी १९ ऑगस्टला विक्रम पावसकर याने मोर्चा काढला. या मोर्चातही वादग्रस्त घोषणा देण्यात आल्या. या मोर्चाला परवानगी होती का ? या मोर्चात पावसकर याने चिथावणीखोर भाषण केले. मात्र, पावसकर हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्तीय असल्यानेच पोलीस त्याच्यावर कारवाई करत नाहीत.याबाबत २२ ऑगस्ट व ८ सप्टेंबरला दोनवेळा निवेदन देण्यात आले. मात्र, कोणतीच कारवाई झाली नाही. उलट दुसऱ्याच दिवशी दोन हजार लोकांनी मशिदीत येऊन तेथील नासधूस केली. यात एकाचा मृत्यू तर १५ लोक जखमी झाले. पोलीस यंत्रणा भाजपच्या दबावाखाली काम करत आहे. केलेल्या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर राज्यभर आंदोलन करणार. यावेळी कोल्हापुर जिल्हाध्यख इम्रान सनदी, अकिल मुजावर, धर्मराज साळवे, फय्याज शेख, दीपक कांबळे, विकास येडके उपस्थित होते.
या केल्या मागण्या
- पोलीस अधीक्षकांसह संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करा
- दंगलीतील मृत तरुणांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्या
- मृताच्या पत्नीला नोकरी द्या
- गंभीर जखमींना एक लाख रुपये नुकसान भरपाई द्या
- मशिदीची नुकसान भरपाई दंगलखोरांकडून वसूल करा