धार्मिक तेढ वाढविणाऱ्या सरकारला खाली खेचा
By Admin | Published: November 8, 2016 01:13 AM2016-11-08T01:13:35+5:302016-11-08T01:28:12+5:30
चंद्रकांत यादव : कम्युनिस्ट क्रांती शतकमहोत्सवास प्रारंभ
कोल्हापूर : सध्याचे सरकार धार्मिक, जातीय व भावनिक स्तरांवर तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. १९१७ मध्ये रशियात झार राजाची जुल्मी सत्ता उधळवून लावण्याची क्रांती कम्युनिस्टांनी केली. तीच वेळ भारतात आली असून सरकारला खाली खेचा, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते चंद्रकांत यादव यांनी केले.
रशियात ७ नाव्हेंबर १९१७ ला झालेल्या बोल्शेविक क्रांतीला शंभर वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त भारतीय कम्यूनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशान या पक्षांच्यावतीने मिरजकर तिकटी येथील हुतात्मा क्रांती चौकात शतक महोत्सवी कार्यक्रमाचा सोमवारी प्रारंभ करण्यात आला. यानिमित्ताने वर्षभर फिल्म फेस्टिव्हल, व्याख्यान, आदींच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
पंचवार्षिक योजना रशियातून आयात केल्याचे सांगत चंद्रकांत यादव म्हणाले, सरकार सगळे उद्योग नफ्यावर आधारित चालवित आहे. जोपर्यंत गरजेवर आधारित व्यवसाय निर्माण होणार नाहीत, तोपर्यंत सामान्य माणसांच्या जीवनात चांगले दिवस येणार नाहीत. सर्वसामान्य कामगार व शेतकरी रस्त्यावर आल्याने काय घडू शकते, हे कम्युनिस्ट क्रांतीने जगासमोर दाखवून दिल्याचे सांगत नामदेव गावडे म्हणाले, १९१७ मध्ये रशियात झार राजाची जुल्मी राजवट शेतकरी व कामगारांनीच उधळून लावली. त्याप्रमाणे आता भारतात उठाव करावा लागणार आहे.
सतीशकुमार कांबळे यांनी स्वागत केले. संभाजी जगदाळे, अनिल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रशियन क्रांती संदर्भातील चित्रफीतही दाखविण्यात आली. यावेळी बाबूराव कदम, बी. एस. बर्गे, गिरीष फोंडे, मीना चव्हाण, रमेश वडणगेकर, प्रशांत आंबी, आदी मान्यवर उपस्थित होते.
रशिया येथील बोल्शेविक क्रांतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाव्या पक्षांच्यावतीने सोमवारी मिरजकर तिकटी येथील हुतात्मा चौकात आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत यादव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबूराव कदम, नामदेव गावडे, संभाजी जगदाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.