समीरच्या कुटुंबाला धक्का
By admin | Published: September 18, 2015 01:01 AM2015-09-18T01:01:53+5:302015-09-18T01:02:16+5:30
आई, भाऊ कोल्हापुरात : घराला पोलीस संरक्षण
सांगली : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित समीर विष्णू गायकवाड (रा. मोती चौक, सांगली) गेल्या चार-पाच वर्षांत कुटुंबाच्या संपर्कातच नव्हता. सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक राहिल्याने त्याचे कुटुंबही त्याची फारशी चौकशी करीत नव्हते, पण समीरला पानसरेंच्या हत्येप्रकरणी अटक झाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबीयांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. पहिल्यांदाच आम्ही असल्या प्रकरणाला सामोरे जात असल्याची भावना त्याची भावजय सुनीता सचिन गायकवाड यांनी व्यक्त केली.
गुरुवारी दुपारी एक वाजता ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने येथील शंभरफुटी रस्त्याला लागून असलेल्या मोती चौकातील शनी मंदिरामागील समीरचे घर गाठले. बुधवारी असलेला कडेकोट पोलीस बंदोबस्त कमी करण्यात
आला आहे.
घराबाहेर केवळ एक हत्यारबंद पोलीस आहे. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. त्याचा पुतण्या बाहेर खेळत होता. समीरचे आजोबा भीमराव गायकवाड यांनी दरवाजा उघडला. ‘काय पाहिजे’, असे त्यांनी विचारले. तेवढ्यात त्याची
भावजय सुनीता पळत आली. ‘आजोबांना काही सांगू नका, ते आजारी असतात. समीरबद्दल समजले, तर त्यांना ते सहन होणार नाही...’, अशी आर्जवे त्यांनी केली. त्यांनी घरातील छायाचित्रेही घेऊ दिली नाहीत. छायाचित्रकाराने कॅमेरा काढताच त्यांनी तो परत बॅगेत ठेवण्यास बजावले.
बुधवारी समीरच्या घरात जाण्यास आणि त्याच्या कुटुंबियांशी बोलण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता. आज मात्र ती बंधने नव्हती. समीरचे आजोबा आजारी असतात. त्यातच त्यांना ऐकायलाही कमी येते. त्यामुळे सुनीता यांच्याशीच संवाद साधला. त्या सांगू लागल्या... समीर आणि त्याची पत्नी सनातन संस्थेचे साधक असल्याची माहिती होती. घरी आल्यावर ‘काय काम करतोस’, असे विचारले की, तो काहीच सांगत नसे. समीरचे पूर्वी संकेश्वरमध्ये मोबाईल दुरुस्तीचे दुकान होते. त्यानंतर त्याने तेथील दुकान बंद करून सांगलीत सुरू केले. तेही बंद करून तो ‘सनातन’च्या आश्रमात दाखल झाला. तो सणासुदीला दोन-चार दिवस सांगलीतील घरी येत असे. घरातील लोकांशी जास्त बोलत नसे. कोणी काही विचारले की, तेवढेच बोलायचा. त्या सांगत होत्या... प्रत्येकवर्षी तो गणेशोत्सवाला यायचा. आल्यानंतर घरातील एक खोली रंगवून स्वत: उत्सवाची तयारी करीत असे. यंदाही तो सोमवारी पहाटे घरी आला होता. दिवसभर त्याने खोलीतील पसारा काढून स्वच्छता केली. दुसऱ्यादिवशी (मंगळवार) रात्री साडेआठ वाजता तो खोली रंगविण्यासाठी रंग खरेदी करायला गेला होता. जाताना त्याने रंग घेऊन येतो, असे सांगितले. त्याच्यासोबत जेवायचे असल्याने आम्ही वाट पाहत बसलो होतो. तो साडेनऊ वाजले तरी आला नाही. त्यामुळे त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला, पण मोबाईल बंद होता. कदाचित तो मिरजेतील आश्रमात गेला असेल, असा विचार करून आम्ही पुन्हा त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला नाही...
घरात पंचवीसभर पोलीस
‘मंगळवारी रात्री साडेआठला गेलेला समीर दुसऱ्यादिवशीही आला नव्हता. मात्र, दुपारी बारा वाजता अचानक पोलीस आले आणि घराची झडती सुरू केली. काय सुरू आहे, हे आम्हाला काहीच समजले नाही. शेवटी धाडस करून विचारल्यानंतर त्यांनी, समीरला गोविंद पानसरेंच्या खूनप्रकरणी अटक केल्याचे सांगितले. गणवेशातील आणि साध्या वेशातील पंचवीसभर पोलीस घरात तळ ठोकून होते. घरातील सगळे साहित्य त्यांनी तपासले. उलथापालथ केली. सायंकाळी झडती संपली. पोलिसांनी जाताना काही साहित्य नेले आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे आमचे हात-पाय गळून गेले होते. सासूबाई व पतीला मंगळवारी दुपारीच कोल्हापूरला नेले आहे, ते अद्याप परतलेले नाहीत,’ असे शेवटी सुनीता यांनी स्पष्ट केले.