पुष्पा भावे यांची कोल्हापुरशी वैचारीक नाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 04:52 PM2020-10-03T16:52:32+5:302020-10-03T16:55:50+5:30
ज्येष्ठ कृतीशील विचारवंत, लेखिका, आणि स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर गाभारा प्रवेश असो वा आंतरजातीय विवाह असो प्रत्येक चळवळीत कृतीशील सहभागच नव्हे तर पुढाकार घेतला.
इंदुमती गणेश
कोल्हापूर : ज्येष्ठ कृतीशील विचारवंत, लेखिका, आणि स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर गाभारा प्रवेश असो वा आंतरजातीय विवाह असो प्रत्येक चळवळीत कृतीशील सहभागच नव्हे तर पुढाकार घेतला. त्यांनी व्यवस्थेला परखडपणे जाब विचारतानाचा त्यामागचा पुरोगामी विचार रुजवला. त्यांच्या या कार्याला सलाम करत २०१८ साली त्यांना राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
पुष्पा भावे यांचे शनिवारी निधन झाले आणि त्यांचे कोल्हापुरशी असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा मिळाला. महाराष्ट्र स्त्री अभ्यास व्यासपीठचे पहिले अधिवेशन १९८९ साली गारगोटीत झाले होते तेंव्हापासून त्यांचा प्रा. डॉ. भारती पाटील यांच्याशी परिचय होता.
पुष्पाताईंचे विचार ऐकत, जगत आणि बघत भारती पाटील, मेघा पानसरे, तनुजा शिपूरकर यांच्यासारखे वैचारीक बैठक असणारे कार्यकर्ते घडले. शिवाजी विद्यापीठात आयोजित केल्या जाणाऱया अनेक कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्रांमध्ये, त्यांनी बीज भाषण केले आहे.
शारदाबाई पवार अध्यासनच्या सल्लागार होत्या. तसेच विद्यापीठातर्फे शिवादी महाराज यांच्या नावाने सुरु करण्यात येणाऱया पुरस्कार समितीवरही त्या होत्या. स्त्री अभ्यास केंद्र, केशव गोरे ट्रस्ट अशा संस्थांवर त्या कार्यरत होत्या.
२००३ साली आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी जागतिकीकरण आणि स्त्रिया " या विषयावर त्यांनी विस्तृत मांडणी केली. संध्याकाळी मिरवणुकीतही त्या उत्साहाने सामील झाल्या.
आंतरजातीय- आंतरधर्मीय विवाह सहायता केंद्र आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या संदर्भातील कार्यक्रमात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत अनेकदा त्यांनी मार्गदर्शन केले. कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. अशोक चौसाळकर यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध कायम राहिले.
दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेस त्या अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या. गेल्या वर्षी विद्यापीठातील बैठक ही त्यांची अखेरची कोल्हापूर भेट होती.