Kolhapur: पुष्पा गायकवाड, सागर वातकर यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 01:20 PM2024-09-03T13:20:15+5:302024-09-03T13:20:28+5:30
कोल्हापूर : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात येणारा २०२३-२४ चा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार महापालिकच्या ...
कोल्हापूर : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात येणारा २०२३-२४ चा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार महापालिकच्या जरगनगर येथील लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर शाळेतील उपक्रमशील सहायक शिक्षिका पुष्पा सुभाष गायकवाड व उषाराजे हायस्कूलचे शिक्षक सागर वातकर यांना सोमवारी जाहीर झाला.
शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणाचा सन्मान करण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार देण्यात येतो. एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असून, गुरुवारी (दि.५ ) मुंबईत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
गायकवाड यांचा स्पर्धा परीक्षेचे अध्यापन करण्यात हातखंडा असून, आजपर्यंत त्यांचे असंख्य विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय, सातारा सैनिक स्कूल अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये चमकले आहेत. २०११ ते २०२२ या काळात महापालिकेच्या टेंबलाईवाडी शाळेत असताना गायकवाड यांचे शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले आहेत. त्या स्वतः उत्तम लेखिका कवयित्री आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन प्राथमिक शिक्षक गटातून त्यांना राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला.
उपक्रमशील शिक्षकाचा गौरव
ताराराणी विद्यापीठ संचलित उषाराजे हायस्कूलचे सहायक शिक्षक सागर पांडुरंग वातकर यांना माध्यमिक शिक्षक गटातून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला. वातकर हे प्रसिद्ध वक्ते, लेखक आहेत. राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळावर ते सदस्य असून, शैक्षणिक क्षेत्राला स्वतःच्या नवप्रकल्पाद्वारे दिशा देणारे अनेक उपक्रम त्यांनी सादर केले आहेत.
राज्य शासनाचा मिळालेला हा पुरस्कार माझ्या प्रामाणिक कष्टाचे फळ आहे. पालकांनी व सहकाऱ्यांनी केलेल्या सहकाऱ्यामुळेच हे शक्य झाले. - पुष्पा गायकवाड, सहशिक्षिका, जरगनगर शाळा
हा पुरस्कार म्हणजे माझ्या भविष्यकाळातील कार्यासाठी एक नवी प्रेरणा आहे. शिक्षणासारख्या पवित्र्य क्षेत्रात स्वावलंबी, समाजशील व राष्ट्रनिष्ठ युवक घडविणे ही शिक्षण क्षेत्राची जबाबदारी आहे. मी एक शिक्षक म्हणून यामध्ये पूर्ण योगदान देण्यासाठी बांधील असेल. - सागर वातकर