गडहिंग्लजचा फुलेवाडीला धक्का

By Admin | Published: April 18, 2015 12:26 AM2015-04-18T00:26:21+5:302015-04-18T00:29:36+5:30

मुस्लिम बोर्डिंग चषक फुटबॉल : शिवाजी तरुण मंडळाचाही दणदणीत विजय

Pushwadi Push of Gadhinglaj | गडहिंग्लजचा फुलेवाडीला धक्का

गडहिंग्लजचा फुलेवाडीला धक्का

googlenewsNext

कोल्हापूर : बलाढ्य समजल्या जाणाऱ्या फुलेवाडी क्रीडा मंडळावर नवख्या गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने तोडीस तोड खेळ करत टायब्रेकरवर ५-३ अशी मात केली; तर दुसऱ्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने प्रॅक्टिस क्लब (ब)चा ४-० असा धुव्वा उडवत मुस्लिम बोर्डिंग चषक फुटबॉल स्पर्धेची पुढील फेरी गाठली.
शाहू स्टेडियम येथे शुक्रवारी फुलेवाडी विरुद्ध गडहिंग्लज युनायटेड यांच्यात सामना झाला. प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक व वेगवान खेळाचे प्रदर्शन केले. फुलेवाडीकडून रोहित साठे, तेजस जाधव, रोहित जाधव, मंगेश दिवसे यांनी, तर गडहिंग्लजकडून प्रवीण मुन्नीवार, अमित सावंत, सूरज तेली, ओंकार जाधव, सनी तोडकर, किरण कावणेकर यांनी खोलवर चढाया केल्या. दोन्ही संघांना पूर्वार्धात गोल न नोंदवता आल्याने पूर्वाध बरोबरीत गेला.
उत्तरार्धात ५० व्या मिनिटास फुलेवाडीकडून मंगेश दिवसेने गोल नोंदवत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी काही काळच राहिली. ५५ व्या मिनिटास तोडीस तोड खेळ करत प्रवीण मुन्नीवार याने गोल नोंदवत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. बरोबरी केल्यानंतर गडहिंग्लजकडून शॉर्ट पासिंगचा खेळ करत फुलेवाडीवर दबाव निर्माण केला. अखेरपर्यंत सामना १-१ बरोबरी राहिल्याने पंचांनी सामन्याचा निकाल टायब्रेकरवर लावण्याचा निर्णय घेतला. त्यात गडहिंग्लजकडून अमित सावंत, सूरज तेली, ओंकार जाधव, सनी तोडकर, किरण कावणेकर यांनी, तर फुलेवाडीकडून तेजस जाधव, निखिल खाडे, रोहित जाधव यांनी गोल केले. त्यामुळे हा सामना ५-३ असा गडहिंग्लज युनायटेड संघाने जिंकला.

प्रॅक्टिस (ब)चा 0-४ने धुव्वा
दुसरा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस (ब) यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून शिवाजी तरुण मंडळाच्या शिवतेज खराडे, आकाश भोसले, स्वप्निल पाटील, वैभव राऊत, संदीप पोवार, अमृत हांडे यांनी उत्कृष्ट खेळ केला.
२७ व्या व ४५ व्या मिनिटास शिवतेज खराडेच्या पासवर आकाश भोसलेने गोल नोंदवत २-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धातही शिवाजीकडून वैभव राऊतने ७० व्या मिनिटास गोल करत आघाडी ३-० अशी भक्कम केली.
प्रॅक्टिस (ब)कडून गोलरक्षक अमोल पसारे पुढे येऊनही खेळत होता. त्याचा फायदा शिवाजीच्या वैभव राऊतला घेता आला नाही. त्याने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या.
९ व्या मिनिटास शिवाजीच्या संदीप पोवारने गोल नोंदवत ४-० अशी भक्कम आघाडी मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले.

Web Title: Pushwadi Push of Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.