फरार साधकांचे फोटो पोलिस ठाण्यात लावा
By admin | Published: June 20, 2016 12:41 AM2016-06-20T00:41:42+5:302016-06-20T00:52:51+5:30
अविनाश पाटील यांची मागणी
कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, डॉ. एम. एन. कलबुर्गी या पुरोगामी विचारांच्या व्यक्तींची हत्या करणाऱ्या ‘सनातन’ संस्थेच्या फरार साधकांचे फोटो सर्व पोलिस ठाण्यांमध्ये लावून त्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी ‘अंनिस’चे राज्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात म्हटले आहे, डॉ. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास अजून पूर्ण न झाल्याने ‘अंनिस’तर्फे राज्यभरात निदर्शने करण्यात येणार आहेत. संशयित ‘सनातन’ व हिंदू जनजागरण समितीवर कायदेशीर कारवाई करावी. रेड कॉर्नर नोटीस असलेले सनातन संस्थेचे साधक सारंग अकोलकर, प्रवीण लिमकर, रूद्र पाटील, जयप्रकाश हेगडे हे २००९ पासून फरार आहेत. त्यांच्यावर डॉ. दाभोलकर हत्येमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे ‘एनआयए’च्या वेबसाईटवर त्यांचे फरार आरोपी म्हणून असलेले फोटो ‘अंनिस’तर्फे पोलिसांना देण्यात येणार आहेत.