मुरगूडमधील रोडरोमिओंना वठणीवर आणा
By admin | Published: July 29, 2016 12:05 AM2016-07-29T00:05:19+5:302016-07-29T00:28:14+5:30
पालक, मुलींची मागणी : नेहमीचाच त्रास; पोलिसांबरोबर सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा
अनिल पाटील -- मुरगूड -कॉलेज, शाळा सुरू झाल्यामुळे मुरगूड एस. टी. स्टॅँड ते महाविद्यालय मार्गावर रोडरोडरोमिओंनी उच्छाद मांडला आहे. या रोडरोमिओंना वठणीवर आणण्याची मागणी मुलींसह पालक करीत आहेत. केवळ वृत्तपत्रात बातमी आली की कारवाईचा फार्स करणाऱ्या पोलिसांकडून अपेक्षाभंग झाल्याने शहरातील सेवाभावी संस्थांनी यामध्ये पुढाकार घेऊन हा प्रश्न कायमचा मिटविण्याचची गरज आहे.
मुरगूड शहरात तीन महाविद्यालये, चार हायस्कूल, आय. टी. आय., यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र शिवाय संगणक प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था, यामुळे परिसरातील पन्नासहून अधिक खेड्यांतील हजारो विद्यार्थिंनी दररोज येतात. एस. टी. स्टँडपासून ते महाविद्यालयापर्यंत या सर्वांनाच चालत जावे लागते. त्यामुळे सकाळी सात ते आठ, तसेच साडेदहा ते दुपारी एकपर्यंत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत रोडरोमिओ या विद्यार्थिनींना त्रास देण्याचा प्रयत्न करतात.
मुलींच्या मागे मागे जाणे, गाडीवरून वेगाने अश्लील हावभाव करणे, मोबाईलवर फोटो काढणे, इतकेच काय एस.टी.मध्ये जाऊन छेडछाड करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. या रोडरोमिओंची परिसरामध्ये दहशत असल्याने आणि ग्रुप करून ते फिरत असल्याने त्यांच्या विरोधात कोणीच तक्रार करण्यास धजावत नाही; पण सर्वसामान्य नागरिक आणि पालकांतून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुदाळ तिट्टा आणि बिद्री परिसरातील या रोमिओंनी उच्छाद मांडला आहे. यांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांबरोबर सेवाभावी संस्थांनी पुढकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. नगरपलिकेने व एस.टी. प्रशासनाने संयुक्तपणे स्टॅँड परिसरात जर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविले, तर स्टॅँडवर घुटमळणाऱ्या रोमिओंची संख्या निश्चितच कमी होईल. तसेच शैक्षणिक संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र सक्तीचे करून शाळा, महाविद्यालयाच्या आवारात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे परिसरातील दंगामस्ती करण्याऱ्यांवर नक्कीच आळा बसणार आहे.
मुरगूड पोलिसांन गर्दीच्या वेळी पेट्रोलिंग करून छेडछाड करणाऱ्या रोमिओंवर कडक कारवाई करावी लागणार आहे. तसेच कॉलेज सुटण्याच्या वेळी स्टॅँड परिसरात पोलिसांची उपस्थिती गरजेची आहे.
मुलींचा शाळाबाह्य प्रवेश रोखला
मुलींच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असल्याने शाळेतील शिक्षकांनी कंबर कसली आहे. शहरातील एका शाळेने पालकांच्या मागणीनुसार मुली शाळेमध्ये एकदा आल्या की शाळा सुटल्यानंतरच त्यांना शाळेच्या आवाराच्या बाहेर सोडले जाते. कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर सोडले जात नाही.. या उपक्रमाचेही परिसरातून कौतुक होत आहे.