राजकीय ओळख बाजूला ठेवून आम्ही मराठा समाजासोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:43+5:302021-05-29T04:18:43+5:30
कोल्हापूर : पक्ष, राजकीय ओळख बाजूला ठेवून आम्ही मराठा समाजासोबत असल्याचे सांगत सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा जाहीर ...
कोल्हापूर : पक्ष, राजकीय ओळख बाजूला ठेवून आम्ही मराठा समाजासोबत असल्याचे सांगत सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा जाहीर केला. आरक्षणाबाबत केंद्र, राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
येथील छत्रपती शिवाजी चौकातील सकल मराठा समाजाच्या धरणे आंदोलनात त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. मराठा आरक्षणासाठी ज्या-ज्या ठिकाणी आंदोलन होईल, त्यामध्ये पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून भाजपचे नेते, कार्यकर्ते एक नागरिक म्हणून सहभागी होतील. कोल्हापुरात सुरू झालेल्या आंदोलनानंतर पुढे काय होते, ते राज्याने टोल आंदोलनात पाहिले आहे. मराठा समाजाच्या संयमाचा सरकारने अंत पाहू नये. मराठा आरक्षणातून यापूर्वी नियुक्त झालेल्या उमेदवारांना तत्काळ सेवेत रुजू करून घ्यावे. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाप्रमाणे सोयीसुविधा द्याव्यात, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. मराठा समाजासोबत मी आहे. आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे, तर विशेष अधिवेशन घेण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहोत. पालकमंत्री सतेज पाटील पाठपुरावा करत आहेत. खासदार संभाजीराजे यांचा राज्यभर दौरा सुरू आहे. राजकारण टाळून सर्वांनी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याची मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी केली. राज्य सरकार हे मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. आरक्षण देण्याबाबतची भूमिका सरकारने लवकर जाहीर करावी. विशेष बजेट देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शिक्षण, नोकरीतील आवश्यक सुविधा द्याव्यात, असे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
कोण, काय म्हणाले?
आमदार चंद्रकांत जाधव : आरक्षणाच्या विषयात पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. आरक्षणासाठी वेळ आली, तर दिल्लीला धडक देण्याची आपण तयारी करू या.
भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे : आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी कोल्हापुरातून पडल्याचा अभिमान आहे. या ठिणगीतून निर्माण होणारी आग मुंबईपर्यंत पोहोचले. केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करून आरक्षण देण्याबाबत पाऊल टाकले आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार : मराठा समाजाच्या आंदोलनाला सर्व खासदार, आमदारांनी साथ द्यावी. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचाही आंदोलनाला पाठिंबा आहे.