प्रा. जालंदर पाटील लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:44 AM2021-02-28T04:44:14+5:302021-02-28T04:44:14+5:30

गाडी, माडी आणि माझे कुटुंब यामध्ये अडकलेली संस्कृती आपणास आजूबाजूला पाहावयास मिळते. मात्र त्याला छेद देत राशिवडे बुद्रुक (ता. ...

Pvt. Jalandhar Patil article | प्रा. जालंदर पाटील लेख

प्रा. जालंदर पाटील लेख

Next

गाडी, माडी आणि माझे कुटुंब यामध्ये अडकलेली संस्कृती आपणास आजूबाजूला पाहावयास मिळते. मात्र त्याला छेद देत राशिवडे बुद्रुक (ता. राधानगरी) येथील प्रा. जालंदर पाटील यांनी कर्तव्यनिष्ठतेने निभावत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सारा महाराष्ट्र पालथा घातला. असे अभ्यासू शेतकरी नेता आज, रविवारी भाेगावती महाविद्यालयातील तब्बल ३५ वर्षांच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या संघर्षमय वाटचालीवर टाकलेली नजर...

प्रा. जालंदर पाटील यांचा गरीब कुटुंबात जन्म झाला. जेमतेम २५ गुंठे जमीन असल्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ते शिक्षण घेत राहिले; मात्र अनेक अडचणी येत राहिल्या. त्यातूनच १९७९ ला त्यांनी ‘भोगावती’ साखर कारखान्याच्या वाहनावर ऊसतोड मजूर म्हणूनही काम केले. या काळात शेती, शेतकरी आणि त्यांचे शोषण करणारी यंत्रणा याचा अभ्यास झाला. एम. ए., बी. एड., एम. फिल केल्यानंतर १९८६ ला स्वामी विवेकानंद महाविद्यालय, कऱ्हाड येथे नोकरी मिळाली. वर्षभरातच भोगावती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून संधी मिळाली. प्राध्यापक असल्याने सुरुवातीपासूनच चांगला पगार मिळत गेला. हातात चार पैसे आल्यानंतर कुटुंबातील लोकांचा विसर पडलेली उदाहरणे आपण रोज पाहतो. मात्र जालंदर पाटील यांनी काळ्या आईच्या वेदना काय आहेत? त्यातून आपल्यासारख्या लाखो कुटुंबांची झालेली परवड पाहिली आहे. शेतकऱ्याच्या घामाला दाम मिळाल्याशिवाय काळ्या आईला न्याय मिळणार नाही, ही खूणगाठ बांधून प्रा. पाटील यांनी २००४ ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पताका खांद्यावर घेतली. त्यांच्यातील अभ्यासू आणि आक्रमकता पाहून संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. याच कालावधीत ‘स्वाभिमानी’ संघटना बाळसे धरत होती. त्यात प्रा. पाटील यांच्यासारखे अभ्यासू नेतृत्व मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संघटना मजबूत झाली. ‘स्वाभिमानी’ची मुलुखमैदान तोफ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

कोट-

एका जबाबदारीतून मुक्त होत असताना आता काळ्या आईच्या सेवेसाठी अधिक वेळ देता येईल, याचा आनंद वाटतो. महाराष्ट्रभर फिरून संघटना बळकट करण्याबरोबरच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू.

- प्रा. जालंदर पाटील

प्रा. पाटील यांच्याबद्दल न सुटलेले कोडे

प्रा. जालंदर पाटील यांनी गेली वीस वर्षे शेतकरी चळवळीत राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. साखर कारखानदारांची मखलाशी आणि राज्य सरकारची पाठराखण यावर आसूड ओढण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. दोन विधानसभेच्या निवडणुका लढविल्या; मात्र त्यात अपयश आले. त्यांच्यासारखा अपवाद वगळता अभ्यासू व चौफेर अनुभव असलेला सदस्य विधिमंडळात दिसत नाही. मग त्यांना संधी का मिळत नाही, हे न सुटलेले कोडे आहे.

विकासासाठी पद सोडणारे पहिले सदस्य

प्रा. पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून काम केले. मात्र वाड्यावस्त्या, धनगरवाडे यांना पायाभूत सुविधांसाठी निधी न दिल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला. विकास कामासाठी पद सोडणारे ते पहिले सदस्य ठरले.

- राजाराम लोेंढे

(फोटो-२७०२२०२१-काेल-जालंदर पाटील)

Web Title: Pvt. Jalandhar Patil article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.