एन. डी. सर आणि कोल्हापुरातील टोल लढा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 02:45 PM2022-01-17T14:45:19+5:302022-01-17T14:47:51+5:30
आयुष्यात त्यांनी अनेक लढे अंगावर घेतले व बलाढ्या राजकीय व खासगी कंपन्यांच्या छाताडावर बसून त्यांनी ते यशस्वी करून दाखविले.
कोल्हापूर : प्रा.एन.डी.सर आणि लढे याचे आयुष्यभर अतूट नाते राहिले. किंबहुना गोरगरिब कष्टकऱ्यांच्या न्यायाचे लढे हीच त्यांच्या जगण्याची खरी उर्जा राहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासून सुरु झालेल्या लढ्याची परंपरा त्यांच्या मृत्यूपर्यंत कायम राहिली. आयुष्यात त्यांनी अनेक लढे अंगावर घेतले व बलाढ्य राजकीय व खासगी कंपन्यांच्या छाताडावर बसून त्यांनी ते यशस्वी करून दाखविले.
रायगड जिल्ह्यातील सेझला लढा हा रिलायन्स कंपनीविरुध्द होता. परंतू सर मागे सरले नाहीत. कोल्हापूरातील टोललढा हा आयआरबी कंपनीच्या विरोधात होता. परंतू कोल्हापूरातून टोल हद्दपार होण्याचे खरे श्रेय हे एन.डी.सर व ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाचाचे. त्यांच्या वैचारिक नेतृत्वामुळेच या लढा यशस्वी झाला.
विरोधातील कंपनीने सगळ्या पातळीवर हा लढा मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्याकाळातील राज्यातील काँग्रेस आघाडीचे सरकार हे तसे कंपनीच्या बाजूनेच होते. कारण खासगीकरणाच्या धोरणातून स्विकारलेला हा प्रकल्प मागे घेतला तर देशभर त्याचे परिणाम उमटतील अशी भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची होती.
एन.डी.सर त्यासंदर्भातील कोणत्याही बैठकीला गेल्यावर त्यांचे पहिले वाक्य हेच असे की टोल आम्ही देणार नाही....मग मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणायचे टोल देणार नाही अशीच जर कृती समितीचे भूमिका असेल तर या प्रश्र्नांवर चर्चाच होवू शकत नाही. आणि घडलेही तसेच. काँग्रेसच्या काळात हा प्रश्र्न लोंबकळत राहिला.
पुढे महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यावर भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयआरबी कंपनीला ४८५ कोटींची भरपाई देवून टोल रद्द करण्याची घोषणा केली व कोल्हापूरची मान टोलच्या जोखडातून मोकळी झाली. सुमारे सहा वर्षे हा संघर्ष सुुरु होता. परंतू त्या सगळ्या आंदोलनात एन.डी.सर कायमच अग्रभागी राहिले. त्यांचे चारित्र्यवान आणि लढाऊ नेतृत्व लाभल्यानेच कंपनीला मान झुकवावी लागली.