प्र-कुलगुरूपदासाठी कणसे, चौगुले यांच्यासह पाचजणांचे बायोडाटा कुलगुरूंकडे सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 11:58 AM2020-11-10T11:58:15+5:302020-11-10T12:00:37+5:30
shivajiuniversity, vc, educationsector, kolhapurnews शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदावर अधिविभागांतील प्राध्यापकांऐवजी संलग्नित महाविद्यालयांमधील अनुभवी आणि विद्यापीठ कायद्याची माहिती असणाऱ्या प्राचार्यांना संधी द्यावी, अशी आग्रही भूमिका विद्यापीठ प्राचार्य संघटनेने घेतली आहे.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदावर अधिविभागांतील प्राध्यापकांऐवजी संलग्नित महाविद्यालयांमधील अनुभवी आणि विद्यापीठ कायद्याची माहिती असणाऱ्या प्राचार्यांना संधी द्यावी, अशी आग्रही भूमिका विद्यापीठ प्राचार्य संघटनेने घेतली आहे.
या पदासाठी इच्छुक असणाऱ्या प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे (डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली), प्रवीण चौगुले (डी. आर. माने कॉलेज कागल), व्ही. एम. पाटील (न्यू कॉलेज, कोल्हापूर), आर. आर. कुंभार (दत्ताजीराव कदम आर्टस, कॉमर्स कॉलेज इचलकरंजी), मंगलकुमार पाटील (घाळी कॉलेज, गडहिंग्लज) यांचे बायोडाटा (परिचयपत्र) संघटनेने कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे सादर केले आहेत.
माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासमवेत प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांचा कार्यकाळ दि. १८ जूनला संपला. त्यानंतर हे पद रिक्त आहे. कुलगुरूपदी डॉ. शिर्के यांच्या निवड झाली आहे. त्यामुळे आता प्र-कुलगुरू निवडीच्या हालचाली गेल्या १५ दिवसांपासून गतीमान झाल्या आहेत. पूर्वी बीसीयुडी संचालक हे पद होते. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार हे पद आता नाही.
या पदाची सर्व कार्यभार प्र-कुलगुरूंकडे देण्यात आला आहे. महाविद्यालयांशी संबंधित संलग्नतेच्या कामांची जबाबदारी या पदावर आहे. त्यामुळे या पदावर अनुभवी प्राचार्यांना संधी द्यावी, अशी आमची आग्रही भूमिका आणि मागणी असल्याचे विद्यापीठ प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.
समन्वय राहील
विद्यापीठ कॅम्पसवरील डॉ. शिर्के यांची कुलगुरूपदी निवड झाली आहे. प्र-कुलगुरूपदांवर प्राचार्यांना संधी दिल्यास विद्यापीठाच्या कामकाजामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने समन्वय राहण्यास मदत होईल. मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, आदी विद्यापीठांमध्ये प्र-कुलगुरूपदावर प्राचार्यांना संधी दिली आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाबाबत याप्रमाणे विचार व्हावा, अशी मागणी प्राचार्य संघटनेची असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.