Kolhapur: लग्नपत्रिकेवर छापला क्यूआर कोड, आहेराची रक्कम थेट वृद्धाश्रमास; मंगसुळे कुटुंबियांचा आदर्शवत उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 04:43 PM2023-06-19T16:43:41+5:302023-06-19T16:44:47+5:30
ज्यांना आहेर द्यावयाचे आहे, त्यांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून जानकी वृद्धाश्रमाला मदत करा असे केले होते आवाहन
गणपती कोळी
कुरुंदवाड : समाजात लग्नकार्यात विधायक उपक्रम राबवून अनेकजण लक्ष वेधून घेतात. यामध्ये विधायक कामापेक्षा प्रसिद्धी मिळविण्याचाच अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र, औरवाड (ता. शिरोळ) येथील माजी उपसरपंच जयवंत शशिकांत मंगसुळे यांनी लग्नात आहेर न स्वीकारता आहेराच्या रूपातून मिळणारी रक्कम घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमाला देण्याचे आवाहन केले व मदतीसाठी वृद्धाश्रमाचा क्यूआर कोड पत्रिकेत छापून हजारो रुपयांची केलेली मदत तालुक्यासह परिसरात चर्चेची ठरली आहे. त्यामुळे या सामाजिक उपक्रमाचा आदर्श घेण्यासारखा आहे.
जयवंत मंगसुळे यांचा औरवाड येथे विवाह झाला. घराण्याला राजकीय वलय असल्याने सर्वसामान्यांपासून आमदार, खासदारांपर्यंत सर्वांनाच लग्नाचे निमंत्रण देण्यात आले होते. राजकारणाबरोबर समाजकारणाचीही आवड असल्याने स्वत:च्या लग्न सोहळ्यात आहेर न स्वीकारता आहेराच्या माध्यमातून येणारी रक्कम वृद्धाश्रमाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी लग्नपत्रिकेत आहेर स्वीकारले जाणार नाही, मात्र ज्यांना आहेर द्यावयाचे आहे, त्यांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून जानकी वृद्धाश्रमाला मदत करवा, असे आवाहन करून पत्रिकेत जानकी वृद्धाश्रमाचे स्कॅन कोड छापले होते.
लग्न सोहळ्यास येणाऱ्या बहुतेक सर्वच लोकांनी या उपक्रमाचे कौतुक करत उपक्रमाला प्रतिसाद देत पन्नास रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत गुगल पे मदत केली. यातून हजारो रुपयांची मदत वृद्धाश्रमाच्या खात्यावर जमा झाली.
समाजात अनेक दातृत्ववान व्यक्ती आहेत. मात्र, अनेकांना मदतीपेक्षा प्रसिद्धीची हाव मोठी असते. मंगसुळे यांनी लग्न सोहळ्याच्या निमित्ताने वृद्धाश्रमाला प्रामाणिकपणे केलेल्या मदतीचा उपक्रम आदर्शवत ठरत आहे.
घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रम मी जवळून पाहिला आहे. या वृद्धाश्रमात सुदृढ वृद्ध कमी, मात्र अपंग, मतिमंद, अंथरुणावर खिळून पडलेल्या वृद्धांची संख्या जास्त आहे. असे असतानाही या वृद्धाश्रमातून वृद्धांची चांगली सेवा केली जात असल्याने ही मदत प्रामाणिकपणे सेवा केल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमाला मिळावी हीच अपेक्षा होती. त्यामुळे आहेराच्या माध्यमातून मदत देणाऱ्यांची मदत सार्थकी झाल्याचे समाधान वाटले. - जयवंत मंगसुळे, औरवाड