तंटामुक्तीवरूनच तंटा

By admin | Published: September 8, 2015 11:51 PM2015-09-08T23:51:40+5:302015-09-08T23:51:40+5:30

वाठार ग्रामसभेतील प्रकार : अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या कारणावरून दोन गटांत जुंपली

Quarrel | तंटामुक्तीवरूनच तंटा

तंटामुक्तीवरूनच तंटा

Next

नवे पारगाव : वाठार (ता. हातकणंगले) येथील ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या कारणावरून दोन गटांत चांगलीच जुंपली. तंटामुक्तीवरून झालेल्या तंट्यामुळे गावात दुपारपर्यंत तणावपूर्ण वातावरण होते. पेठवडगावच्या पोलिसांच्या बंदोबस्तामुळे हाणामारी टळली. वादावादीमुळेच उधळली गेलेली १५ आॅगस्टची तहकूब ग्रामसभा मंगळवारी आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच काशिनाथ भोपळे होते. तंटामुक्ती समिती बदलाचा विषय सभेच्या पटलावर आला तसा गोंधळाला प्रारंभ झाला. ग्रामसभा सुरू करण्यापूर्वी ज्यांची अहवालावर सही आहे, त्यांचे मतदान घेऊन तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडला जावा, अशी मागणी विरोधी गटाने केली. या गोंधळानंतर अहवाल सभाध्यक्ष सरपंचांच्या हवाली करून तालुका विस्तार अधिकारी सभेतून निघून गेले. उपस्थित दोन्ही बाजूंच्या जमावाचा अंदाज घेऊन सरपंच भोपळे यांनी अध्यक्षपदी गोरखनाथ शिंदे, तर उपाध्यक्षपदी सर्जेराव भोसले यांची निवड जाहीर केली. यावर विरोधी गटाने हरकत घेतली. यावरून दोन गटांत तणाव निर्माण झाला. सरपंच काशिनाथ भोपळे प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, तंटामुक्ती समिती अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड ही शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे लोकशाही पद्धतीने केली आहे. संख्याबळाप्रमाणे तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी आलेल्या अर्जांचा विचार करूनच नावे जाहीर केली असून, ती नियमाप्रमाणेच केली आहे. सभेवेळी वडगाव पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने हाणामारीचा अनर्थ टळला. यावेळी उपसरपंच राजकुमार शिंदे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
विरोधी गटाचे नेते तक्रार करणार
तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठी ग्रामसेवक अथवा शासकीय अधिकारी उपस्थित नसताना सरपंचांनी मनमानी पद्धतीने अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी केल्या. त्याविरुद्ध हातकणंगले गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचे विरोधी गटाचे नेते महेंद्र शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.