सव्वा लाखाचा मारला हात, पोलीस वर्तुळात चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 04:29 PM2020-09-22T16:29:10+5:302020-09-22T16:31:37+5:30
लाच प्रकरण घडण्यापूर्वी आठवडाभर अगोदर याच मटका प्रकरणात आणखी एका अधिकाऱ्याने सुमारे सव्वा लाखाचा हात मारल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह पोलीस खात्याने खोलवर जाऊन चौकशी करण्याची गरज आहे.
तानाजी पोवार
कोल्हापूर : जिल्ह्यात मटका बंद असा फक्त डंका पिटला गेला. प्रत्यक्षात काही पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्रयाखाली गुपचूपपणे मटका सुरू असल्याचे लाच प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे. लाच प्रकरण घडण्यापूर्वी आठवडाभर अगोदर याच मटका प्रकरणात आणखी एका अधिकाऱ्याने सुमारे सव्वा लाखाचा हात मारल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागासह पोलीस खात्याने खोलवर जाऊन चौकशी करण्याची गरज आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अवैध व्यावसायिकांवर वचक ठेवला. त्यामुळे मटका, जुगारासह अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद झाल्याचे वरवर दिसून आले असले तरीही काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका गुपचूपपणे सुरू होता.
विशेषत: राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका बंद होता म्हणणे आता धाडसाचे ठरणार आहे. गेल्यावर्षीही राजारामपुरीतच मटका सुरू असल्याचे मोबाईल शूटिंग व मटक्याच्या चिठ्ठया थेट पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्याचे धाडस एका सामाजिक कार्यकर्त्याने केले होते. त्यानंतर पोलीस ठाण्यातील अंतर्गत अदलाबदल केले.
दोन दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजारामपुरी परिसरात मटक्याचे कनेक्शन असल्याचे उघड केले. राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाचे प्रमुख पद अवघ्या चार महिन्यांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव यांनी घेतले आणि अख्ख्या डी.बी.पथकाचा खरा चेहरा चव्हाट्यावर आला. विशेष म्हणजे, पोलीस उपनिरीक्षकाचे खरे रूप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघड केले हे कौतुकास्पद आहे.
पण याच मटकाचालकांकडून अवघ्या आठवड्यापूर्वी आणखी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सुमारे सव्वा लाखाचा हात मारल्याचीही चर्चा पोलीस खात्यात सुरू आहे. विशेष म्हणजे, या सव्वा लाखाचे दोन हिस्से करून त्याचे वाटपही केल्याचे समजते. अशा पध्दतीने खालच्या पोलिसापासून अधिकाऱ्यापर्यंत ही साखळी असल्याने ही साफसफाई करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी या लाच प्रकरणात पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वक्रदृष्टी दाखवून चौकशीची गरज आहे.
सध्या संबंधित अधिकारी ह्यराम-नाथह्णचा जप करत स्वत:ला वाचवण्यासाठी मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत फोनाफोनी करत आहेत. त्या अधिकाऱ्याच्या पूर्वइतिहासातही झोकून पाहिल्यास अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पोलीस खात्यात सफाईची गरज
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून स्वत:चे खिसे भरणारे काही अधिकारी पोलीस खात्यात वावरत आहेत. एका बाजूला राजकारण्यांशी संबंध ठेवायचे, तर दुसऱ्या बाजूला वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आपली दबावाची नेहमीच कमांड ठेवण्याची अशी यांची ही कार्यपद्धत आहे. मटका प्रकरणात पाळेमुळे खणून अशा अधिकाऱ्यांचा पर्दाफाश केला पाहिजे.
मटका चालवत असल्याची कबुली
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राजारामपुरी छाप्यातील तक्रारदारानेच खुद्द एजंटाकरवी मटका चालवत असल्याची कबुली दिली. त्यामुळे हा मटका कोणाच्या आश्रयाखाली सुरू आहे, त्या मोठ्या माशापर्यंत पोहोचण्याचीही आवश्यकता आहे.