कागलच्या युतीबाबत प्रश्नचिन्हच
By admin | Published: January 13, 2017 01:06 AM2017-01-13T01:06:41+5:302017-01-13T01:06:41+5:30
तिन्ही गटांत संभ्रम : नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चाही नाही, फक्त कार्यकर्त्यांमध्येच चर्चा
कोल्हापूर : माजी आमदार संजय घाटगे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक व भाजपचे नेते समरजित घाटगे यांच्यातील संभाव्य युतीबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम असून तिन्ही गटांमध्ये संभ्रम आहे.
कारण त्यासंदर्भात या तिन्ही नेत्यांची एकत्रित बैठक अथवा प्राथमिक बोलणीही झालेली नाहीत. फक्त कार्यकर्त्यांचा पातळीवरच तसा रेटा आहे आणि वृत्तपत्रांत तशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे आजच्या घडीला तरी ही युती वृत्तपत्रांतील बातम्यांपुरतीच आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीतही संजय मंडलिक व समरजित घाटगे यांच्यातील युतीची अशीच हवा तयार झाली. एकमेकांच्या भेटीगाठीही झाल्या परंतु शेवटी काय घडले व त्याचा परिणाम काय झाला हे निकालावरून तालुक्याला समजलेच. हा अनुभव असताना परत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांसह संजय घाटगे अशी तिघांच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे; परंतु ज्यांनी युती करायची ‘त्या’ तिघांची मात्र अद्याप याबाबत एकदाही चर्चा झालेली नाही. समरजित घाटगे व मंडलिक यांची भेट होणार होती परंतु मंडलिक यांना ऐनवेळी काही तरी काम निघाल्याने ते त्यादिवशी आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यातही चर्चा झालेली नाही. या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा जागा आहेत. गेल्या निवडणुकीत पाचही जागा काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्याने संजय मंडलिक अध्यक्ष होऊ शकले.
मिळालेल्या माहितीनुसार संजय घाटगे यांना मुलासाठी जिल्हा परिषदेची एक जागा, पंचायत समितीच्या दोन जागा व तेथील सत्ता आपल्या गटाकडे आणि आमदारकीला समरजित घाटगे यांनी पाठिंब्याचा ‘शब्द’ द्यावा असे वाटते. मंडलिक यांनी प्रत्येकी दोन जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या जागांची मागणी केली आहे. आतापर्यंत पंचायत समिती कायमच संजय घाटगे गटाकडे राहिली आहे त्यामुळे तिची सत्ता आपल्या गटाकडे असावी, असे मंडलिक गटालाही वाटते. समरजित घाटगे यांच्या गटाकडून जागाबाबत अजूनही पत्ते खुले केलेले नाहीत. नगरपालिकेच्या निवडणुकीत हाता-तोंडाशी आलेला विजयाचा घास दुरावल्याने गटाची सरशी व्हावी एवढीच सध्या तरी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. सन्मानजनक तोडगा होऊन युती झाली तर युती करून अन्यथा स्वबळावर भाजपचे कमळ चिन्ह घेऊन निवडणुकीत उतरण्याची तयारी त्यांच्याकडून सुरू आहे. युतीची चर्चा सुरू ठेवत अखेरपर्यंत संभ्रम राहिला तर ऐनवेळी काय होऊ शकते याचा अनुभव नगरपालिकेला आल्याने हा गट तसा सावध आहे.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची मात्र ‘एकला चलो रे’ची भूमिका आहे. तालुक्यात एकदा आपल्या गटाची ताकद तरी किती आहे कळू दे असे त्यांना वाटते. जिल्हा परिषदेत त्यांच्या पक्षाची सत्ता नाही व तालुक्यात एकही जिल्हा परिषदेचा सदस्य नाही. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत काही गमवायचे नाही. कागलची नगरपालिका त्यांना हवी होती त्यात ते यशस्वी झाले. विधानसभेला अजून बराच अवधी आहे. तोपर्यंत बरेच पाणी पुलाखालून वाहून जाणार आहे. त्यामुळे मुश्रीफ सध्या तरी दोन घाटगे व मंडलिक यांच्या संभाव्य युतीकडे लांबून लक्ष ठेवून आहेत.