कागल पालिका दुकानगाळ्यांचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:25 PM2017-09-11T23:25:27+5:302017-09-11T23:25:27+5:30
जहाँगीर शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : कागल शहरातील नगरपालिकेच्या दुकानगाळ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीनुसार दुकानगाळ्यांचे भाडे निश्चित करावे आणि प्रत्येकी किमान एक लाख रुपये अनामत घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेऊन तशा नोटिसा दुकानगाळेधारकांना लागू केल्या आहेत.
याबाबत शिवराज्य गाळाधारक असोसिएशनने नोटाबंदी आणि जीएसटीमुळे बाजारपेठ ठप्प आहे. व्यापारी वर्ग ही अनामत भरू शकणार नाही, असे सांगितले आहे. याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन गाळेधारकांच्या शिष्टमंडळाने आपले गाºहाणे त्यांना सांगितले आहे.
नगरपालिकेने वेळोवेळी विविध योजनांमधून शहरात व्यापारी संकुले उभारली आहेत. जवळपास १६० अशी दुकाने आहेत. मात्र यापैकी दहा टक्के दुकानगाळे वर्षानुवर्षे पडून आहेत. तर काही दुकानगाळे नेहमी बंद असतात. पण त्याचे भाडे संबंधित गाळाधारक रितसर अदा करतो. जेथे दुकानगाळ्यांना महत्त्व आहे, मात्र जेथे व्यापार होत नाही तेथे भाडेकरू मिळणेही मुश्किल होते. तसेच भाडेपट्टी आणि अनामत रक्कम किती असावी हे ठरविण्याचा अधिकार नगररचना कार्यालयाला आहे. त्यामुळे त्यांनी ठरविलेल्या रकमेवर दुकानगाळा घेण्यास कोणी तयार होत नसल्याने पालिकेने काही ठिकाणी तडजोडीने भाडेपट्टी आकारली आहे. मात्र आता कागलची विकसित झालेली बाजारपेठ लक्षात घेऊन प्रशासनाने अनामत रक्कम नव्याने आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुकानगाळ्यांचे आर्थिक आॅडिट होणे गरजेचे
कागल नगरपालिकेचे महात्मा फुले मार्केट आता जीर्ण झाले आहे. तेथे वार्षिक भाडे सात ते आठ हजार आहे. तेथे नव्याने संकुल उभारण्यात येणार आहे. याशिवाय पोलीस ठाण्यासमोर अण्णाभाऊ साठे व्यापार संकुल, काकासाहेब वाड्यासमोरचे संकुल, नगरपालिका मुख्य इमारतीजवळ, रिंंगरोडवरील छत्रपती शिवाजी आणि छत्रपती शाहू व्यापार संकुल, सुभाष चौक, घरकुल, जयसिंगराव पार्क येथे ही दुकानगाळे आहेत. ठिकठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे नगरपालिकेने गाळाधारक, लोकप्रतिनिधी आदींची एक समिती नेमून याबद्दल आर्थिक आॅडिट करावे, अशी मागणी होत आहे.