बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लावणार : अविनाश सुभेदार, क्रिडाई कोल्हापूरतर्फे आयोजन ,‘गृहदालन २०१८’चा उत्स्फूर्त प्रतिसादात समारोप-
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:33 AM2018-01-30T00:33:25+5:302018-01-30T00:34:17+5:30
कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिकांचे जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरील प्रश्न हे लवकरात लवकर मार्गी लावले जातील.
कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिकांचे जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरील प्रश्न हे लवकरात लवकर मार्गी लावले जातील. यासाठी येत्या महिन्याभरात ‘क्रिडाई कोल्हापूर’च्या शिष्टमंडळासमवेत बैठक घेतली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी येथे दिले.
येथील शाहूपुरी जिमखाना मैदानावर ‘क्रिडाई कोल्हापूर’तर्फे आयोजित ‘गृहदालन २०१८’च्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘क्रिडाई महाराष्ट्र’चे उपाध्यक्ष राजीव परिख प्रमुख उपस्थित होते. ग्राहक, नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘गृहदालन’चा समारोप झाला. प्रदर्शनाची वेळ संपेपर्यंत गर्दी कायम होती.
जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, प्रत्येकाची इच्छा असते की, आपले स्वत:चे घर असावे. ही इच्छा पूर्ण करण्याची चांगली संधी ‘क्रिडाई कोल्हापूर’ने गृहदालन प्रदर्शनाच्या माध्यमातून कोल्हापुरातील नागरिक, ग्राहकांना उपलब्ध करून दिली. बिनशर्ती परवानगी, ‘वर्ग दोन’च्या जमिनी, टीडीआरची एनओसी, बी टेन्युअर, आदी स्वरूपातील बांधकाम व्यावसायिकांचे जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरील जे प्रश्न आहेत. त्यांची माहिती लिखित स्वरूपात मला द्यावी.
याबाबत येत्या महिनाभरात बैठक घेऊन ते प्रश्न, विविध अडचणी लवकरात लवकर मार्गी लावले जातील. शेरी इनाम जमिनीबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. या कार्यक्रमात ‘क्रिडाई कोल्हापूर’चे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी ‘गृहदालन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, प्रदर्शनात १५ फ्लॅटची नोंदणी झाल्याचे सांगितले.
अध्यक्ष महेश यादव यांनी प्रास्ताविकात कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकांचे विविध प्रश्न, अडचणी मांडल्या. त्यात त्यांनी मिळकत कर कमी करावा. प्राधिकरणाला सीईओ येईपर्यंत पूर्वीप्रमाणे आराखडा मंजुरीची प्रक्रिया सुरू करावी. ‘एन. ए.’चा दाखला आणि सनद देण्याची प्रक्रिया सोपी करावी. ‘बी टेन्युअर’ची प्रकरणे मार्गी लावावीत.
संबंधित प्रश्न, अडचणी लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी ‘क्रिडाई कोल्हापूर’समवेत पुन्हा एखादी बैठक घ्यावी, अशी मागणी यावेळी केली. या कार्यक्रमास विश्वजित जाधव, विजय माणगांवकर, निखिल शहा, प्रदीप भारमल, ए. पी. खोत, सचिन परांजपे आदी उपस्थित होते. अभिजित परांजपे यांनी सूत्रसंचालन केले. प्रदर्शनाचे अध्यक्ष प्रदीप भारमल यांनी आभार मानले.
रेडिरेकनरचा दर ठरविण्याबाबत समिती
यावर्षी रेडिरेकनरचे दर वाढविण्यात येऊ नयेत, अशी मागणी ‘क्रिडाई’ने राज्य शासनाकडे केली. याबाबत सकारात्मकता दर्शवीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रेडिरेकनरचे दर ठरविण्याबाबत समिती नेमली आहे. यामध्ये ‘क्रिडाई महाराष्ट्र’च्या प्रतिनिधींचा समावेश केला जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्री पाटील यांनी दिली आहे. याद्वारे ‘क्रिडाई’चा एकप्रकारे सन्मान झाला असल्याचे ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश यादव यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘गृहदालन’च्या माध्यमातून आम्ही सामाजिक बांधीलकी जपली आहे. याअंतर्गत कचरा वर्गीकरण करून पर्यावरण रक्षणाला हातभार लावणाºया ‘अवनि’ला संस्थेला विनामूल्य स्टॉल दिला. पोलिओ डोस देण्याची रविवारी आणि सोमवारी व्यवस्था केली होती.
महेश शेट्टी ठरले दुचाकीचे मानकरी
‘गृहदालन’मध्ये फ्लॅटची नोंदणी करणाºया ग्राहकांसाठी लकी ड्रॉ आयोजित केला होता. त्यात महेश शेट्टी (अनंत इस्टेट डेव्हलपर्स) हे पहिल्या क्रमांकाच्या दुचाकीच्या बक्षिसाचे मानकरी ठरले. श्रद्धा देसाई (गुरुप्रसाद डेव्हलपर्स) यांना द्वितीय क्रमांकाचे बक्षीस असलेला ४० इंची एलईडी टीव्ही, तर तिसºया क्रमांकाच्या मायक्रो ओव्हन बक्षीस हे असिफ खतीब (घाटगे डेव्हलपर्स) यांना मिळाले. या बक्षिसांची पत्रे जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या हस्ते विजेत्यांना देण्यात आली.
सत्कार, अनुदानाच्या पत्रांचे वाटप
‘गृहदालन’ला सहकार्य करणाºया विनायक सूर्यवंशी, आर. एस. मोहिते, विनोद कांबोज यांचा जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनुदान प्राप्तीची पत्रे आनंदी सूर्यकांत पाटील, सुचेता कानडे, संग्रामसिंह चव्हाण, विकास गवळी, मंदार पोरे, आदींना प्रदान करण्यात आली.
कोल्हापुरात सोमवारी ‘क्रिडाई कोल्हापूर’तर्फे आयोजित ‘दालन २०१६’ प्रदर्शनातील लकी ड्रॉमध्ये महेश शेट्टी हे दुचाकीच्या बक्षिसाचे मानकरी ठरले. त्यांच्यावतीने अनंत इस्टेट डेव्हलपर्सच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते दुचाकीच्या चावीची प्रतिकृती, पत्र प्रदान केले. यावेळी डावीकडून विश्वजित जाधव, विजय माणगांवकर, निखिल शहा, राजीव परीख, महेश यादव, सत्यजित मोहिते, विद्यानंद बेडेकर, सचिन परांजपे, ए. पी. खोत उपस्थित होते.