‘म्हैसाळ’च्या प्रश्नावरून सर्वच पक्षाचे नेते मैदानात
By admin | Published: October 11, 2015 11:10 PM2015-10-11T23:10:02+5:302015-10-12T00:36:40+5:30
श्रेयासाठी धडपड : एकत्रित ताकद लावण्याची गरज
सांगली : म्हैसाळ योजनेच्या थकबाकीचा आणि शेतकऱ्यांवर त्याचा बोजा चढविण्याचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. यावरून सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले असले तरी श्रेयासाठी झटण्यापेक्षा सर्वपक्षीय ताकद लागण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रशासनाने म्हैसाळ योजनेची २0 कोटीची थकबाकी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्याची प्रक्रीया गेल्या आठवड्यात सुरू केली असून त्यास मिरज, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याप्रश्नी आता विविध राजकीय पक्ष व त्यांचे नेतेही आंदोलनाचा इशारा देत आहेत. काहींनी न्यायालयात जाण्याची तयारीही केली आहे. प्रत्येकजण स्वतंत्रपणे लढण्यासाठी प्रयत्नशील असल्याने आंदोलनाची धार कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रीतपणे लढा दिल्यास हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागू शकतो. टोलसारखी सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून शासनस्तरावर याला विरोध झाला तर शेतकरी थकबाकीच्या बोजातून मुक्त होऊ शकतो. तशी अपेक्षा या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांमधूनही व्यक्त होत आहे. प्रशासकीय पातळीवरही त्यामुळे म्हणावा तसा दबाव पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरीही वेगवेगळ््या पक्षीय संघर्षामुळे संभ्रमावस्थेत आहे. (प्रतिनिधी)