परिक्षेत्रातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा प्रश्न
By admin | Published: May 27, 2015 12:24 AM2015-05-27T00:24:22+5:302015-05-27T00:56:46+5:30
संजय वर्मा : गुन्हेगारी मोडीत काढण्याचे अधिकाऱ्यांना आदेश
कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रातील वाढती गुन्हेगारी हा एक चिंतेचा प्रश्न आहे. ती मोडीत काढण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून संयुक्तरीत्या कारवाईची मोहीम राबवावी, असे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर ग्रामीण विभागांतील पोलीस अधीक्षकांची आढावा बैठक मंगळवारी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात घेण्यात आली. यावेळी संजय वर्मा यांनी, परिक्षेत्रामध्ये चेन स्नॅॅचिंग, घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांना लागून बेळगाव- कर्नाटकची हद्द आहे. त्यामुळे कर्नाटकातून सहजासहजी गुन्हेगार येथे शिरकाव करू शकतात. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून संयुक्तरीत्या कारवाई करावी. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात कसूर करू नये.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तडीपार करावे; तसेच शांतता-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करून प्रशासनाला उघड आव्हान देणाऱ्यांना, अवैध व्यावसायिकांना धडा शिकविण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी पाच जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षक उपस्थित होते.