शिरोळ गावठाण विस्तार वाढीचा प्रश्न अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:21 AM2021-05-15T04:21:41+5:302021-05-15T04:21:41+5:30
शिरोळ : शहराच्या विस्तार वाढीचा प्रश्न अंतिम टप्प्यात असून लवकरच या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर एक कोटी सात ...
शिरोळ : शहराच्या विस्तार वाढीचा प्रश्न अंतिम टप्प्यात असून लवकरच या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर एक कोटी सात लाख निधीपैकी पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. त्यामुळे गावठाण विस्तार वाढीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
शिरोळ नगर परिषद विस्तारवाढीसंदर्भात राज्यमंत्री यड्रावकर यांनी शुक्रवारी शिरोळ येथील भूमी अभिलेख कार्यालयात आढावा बैठक घेतली.
यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, तहसीलदार अपर्णा मोरे, भूमी अभिलेख अधिकारी सुवर्णा मसणे उपस्थित होत्या.
सन २००६ साली शिरोळ गावठाण विस्तार वाढीची अधिसूचना प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी गावठाण विस्तार वाढीमध्ये २५६ गट समाविष्ट होते. विस्तार वाढ ही चार गटांमध्ये विभागली होती. ज्यामध्ये औद्योगिक, शेती व इतर असे वर्गीकरण केले होते; पण विस्तार वाढीचे हे काम निधीअभावी जवळपास पंधरा वर्षे रखडले होते. राज्यमंत्री यड्रावकर यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे या प्रश्नासाठी पाठपुरावा करून जिल्हा नियोजन समितीमधून निधीची मागणी केली होती. याचाच भाग म्हणून मार्च २०२१ मध्ये जिल्हा नियोजन समितीकडून नगरपालिकेच्या गावठाण विस्तार वाढीसाठी एक कोटी सात लाखांचा निधी मंजूर झाला होता. या निधीतील पहिला हप्ता लवकरच मिळणार असल्याने गावठाण वाढीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
गावठाण विस्तार वाढीचे हे काम वर्षभरात पूर्ण करण्यासाठी भूमी अभिलेख विभाग सज्ज आहे, असे यावेळी तालुका भूमी अभिलेख अधिकारी मसणे यांनी सांगितले. याप्रसंगी प्रकाश गावडे, योगेश पुजारी, राजेंद्र माने, प्रताप पाटील, विजयसिंह माने-देशमुख, अमर शिंदे, पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार उपस्थित होते.
फोटो - १४०५२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरोळ येथील भूमी अभिलेख कार्यालयात आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आढावा बैठक घेतली.