‘वारणा’चा प्रश्न सामोपचाराने मिटेल:राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:33 AM2019-03-04T00:33:25+5:302019-03-04T00:33:30+5:30
इचलकरंजी : इचलकरंजी शहराची तहान भागविण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न केल्यास वारणा पाणीप्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास खासदार राजू ...
इचलकरंजी : इचलकरंजी शहराची तहान भागविण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न केल्यास वारणा पाणीप्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
इचलकरंजीत पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर व नगराध्यक्षा अलका स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेट्टी म्हणाले, बदलत्या काळानुसार आता व्यवसाय, नोकरी, शिक्षण, पर्यटनासाठी विमानसेवा आवश्यक झाली असून, त्यासाठी पासपोर्टची गरज आहे. त्यामुळे नागरिकांची ही गरज ओळखून इचलकरंजी शहरामध्ये पासपोर्ट सुविधा सुरू करण्यात आली आहे.
देशातील ४०१ वा पुणे विभागातील १८ वे पासपोर्ट सेवा केंद्र इचलकरंजीत पोस्ट कार्यालयांतर्गत जुन्या नगरपालिकेत सुरू करण्यात आले.
पासपोर्ट कार्यालयाचे पुणे विभागाचे अधिकारी अनंत ताकवले यांनी देशभरात ४०१ पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यासाठी परराष्टÑ मंत्रालयाचे तत्कालीन सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या सहकार्यामुळे इचलकरंजीतही कार्यालय सुरू होत असून, पासपोर्ट काढताना चुका टाळण्याचे आवाहन केले.
नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी, शहराचे बहुतांश प्रश्न मार्गी लागल्याने इचलकरंजी स्मार्टसिटीकडे वाटचाल करीत आहे. शहराचा पाण्याचा प्रश्न सोडविणे गरजेचे असून, आमदार हाळवणकर आणि खासदार शेट्टी यांनी शहराची वारणा योजना मार्गी लावून पाणीप्रश्न सोडविण्याचे साकडे घातले.
आमदार हाळवणकर यांनी, देशात ७० वर्षांत केवळ ७७ पासपोर्ट कार्यालये होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पासपोर्ट कार्यालयांची गरज ओळखून अवघ्या पाच वर्षात ४०१ कार्यालये सुरू करण्याचा निर्धार केल्याने अनेक नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, नगरसेवक अजित जाधव, प्रमोद पाटील, इचलकरंजी पोस्ट कार्यालय प्रमुख सी. डी. रानमाळे, सहायक प्रमुख संजय सामानगडकर, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार उपस्थित होते.