बाजारभोगाव पश्चिम भागातील प्रश्न ‘जैसे थे’

By admin | Published: June 29, 2015 12:15 AM2015-06-29T00:15:12+5:302015-06-29T00:15:12+5:30

पडसाली घाटाचा प्रश्न चर्चेत : रस्त्यांची दुरवस्था, शेती धोक्यात

The questions in the west of the market were 'like' | बाजारभोगाव पश्चिम भागातील प्रश्न ‘जैसे थे’

बाजारभोगाव पश्चिम भागातील प्रश्न ‘जैसे थे’

Next

राम करले- बाजारभोगाव -बाजारभोगाव पश्चिम भागातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था, गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडलेल्या पडसाळी घाटाचा तसेच मोबाईल टॉवरचा प्रश्न यामुळे जनतेत शासनाच्या उदासीन कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
बाजारभोगाव पश्चिम भागात पडसाळी-वाशी हे मुख्य मार्ग आहेत. पडसाळी मार्गावर लाखो रुपयांचा चुराडा करूनदेखील हा मार्ग खड्ड्यांच्या समस्येतून मुक्त झालेला नाही. वाशी रस्ता आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान सडक योजनेतून करण्यात आला. मात्र, निकृष्ट कामामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील ओढ्यांवर मोऱ्या काही आवश्यक ठिकाणी बांधलेल्या नसल्याने पावसाळी हंगाम म्हणजे येथील लोकांना डोकेदुखी ठरत आहे. पिसात्री, आढाववाडी, सुबेवाडीजवळ मोऱ्या बांधण्याची मागणी ‘कुंभी’चे संचालक प्रकाश पाटील यांनी केली आहे. तरीही प्रशासनाने याकडे कानाडोळा केला आहे. रस्त्याच्या दुर्दशेचा भोग कधी सुटणार, हा खरा प्रश्न आहे.
येथील लोकांना किमान पायाभूत सुविधा देऊन न्याय द्यावा, अशी मापक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


मोबाईल टॉवर नसल्याने अनेक गैरसोयी
कोलिक, चाफेवाडी, गोठणे, वाशी, आढाववाडी, खापणेवाडी, गुरववाडी, पिसात्री, सोनारवाडी, पोबरे, सुंबेवाडी, आदी गावांमध्ये मोबाईल सेवा नसल्याने येथील ग्रामस्थांना अनेक गैरसोयींचा सामना नेहमीच करावा लागतो. खासदार धनंजय महाडिक यांनी काळजवडे येथे प्रचारादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सभेत याबाबत आश्वासन देऊन आजअखेर त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पिसात्री अथवा कोलिक येथे टॉवर उभार करावा, अशी मागणी हिंदुस्थानी स्पोर्टस्चे अरुण तळेकर, मानवाडचे फुलाजी पाटील, वाशीचे भिकाजी पाटील यांनी केली आहे.


घाटाचा प्रश्न फक्त चर्चेत, कृती शून्य
गेल्या पंधरा वर्षांपासून पडसाळी-कार्जिडा घाटाचा प्रश्न राजकीय नेत्यांनी फक्त चर्चेत ठेवला आहे. शासन दरबारी कृती मात्र शून्य केली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. माजी आमदार विनय कोरे यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात कोलिक येथील जाहीर सभेत आपला मानेदय व्यक्त केला होता. मात्र, एक दगडही हलला नाही. विद्यमान आमदार संबंधित मंत्र्यांना तसेच विधानसभेत आवाज वारंवार उठवित असल्याचे सांगत आहेत. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा जनआंदोलन करू, असा इशारा ‘कोलिक’चे बाळासो पाटील, दत्तात्रय पाटील, गंगाराम रंगराव पाटील, विलास कांबळे, तुकाराम पाटील यांनी दिला आहे.

गवा रेड्यांमुळे शेती धोक्यात
जांभळी खोऱ्यात गवा रेड्यांमुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. वनखात्याकडून गव्याच्या बंदोबस्तासाठी जंगलाभोवती वीस लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्च करून गेल्या चार वर्षांत चरीची खुदाई केली आहे. मात्र, निकृष्ट दर्जामुळे खुदाई केलेली चर म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’, अशी अवस्था आहे. ‘चरी’वरून अलीकडे, पलीकडे जनावरे जात असल्याने गव्यांचा बंदोबस्त कसा होणार त्यामुळे नियोजनबद्ध योजना आखून वन्यप्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणाची गरज आहे.

Web Title: The questions in the west of the market were 'like'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.