किणी टोल नाक्यावर सकाळपासून वाहनांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:30 AM2021-02-17T04:30:50+5:302021-02-17T04:30:50+5:30
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने महामार्ग वापर करणाऱ्या वाहनधारकांना फास्टॅगचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी ...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने महामार्ग वापर करणाऱ्या वाहनधारकांना फास्टॅगचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी याआधी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार १५ फेब्रुवारीमध्ये रात्रीपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. वाहनचालकांचा वेळ वाचण्याबरोबरच इंधनाची बचत होत आहे. टोल नाक्यांवरील गर्दी कमी करण्याचा उपाय म्हणून फास्टॅग प्रणाली वाहनधारकांना अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर फास्टॅगसाठी यंत्रणा बसविण्यात आली. किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्यावरील आठ लेनपैकी सहा लेन फास्टॅगसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दोन्ही बाजूला एक एक लेन फास्टॅग नसणारे वाहनधारकांना ठेवण्यात आले. मात्र, दुप्पट टोल भरावा लागत आहे. यामुळे वादावादी होत असल्याने वाहतूक खोळंबून राहत आहे, तर टोल नाक्यावर दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लांबपर्यंत पोहोचली होती. टोल कर्मचारी व वाहनधारकांच्यात वारंवार वादावादी सुरू राहिल्याने पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर टोल नाक्याजवळ फास्टॅग बसण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टाॅलवर वाहनधारक थांबवून चौकशी करून बसवून घेत असल्याचे चित्र पाहावयाला मिळत होते.
फोटो ओळी
फास्टॅगची सक्ती करण्यात आल्यानंतर किणी (ता. हातकणंगले) येथील टोल नाक्यावरील वाहनाच्या लांबापर्यंत रांगा लागल्या होत्या. (छायाचित्र : संतोष भोसले)