गोकुळसाठी रांगा लावून ९९. ७८ टक्के मतदान, उद्या दुपारपर्यंत गुलाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 11:44 AM2021-05-03T11:44:34+5:302021-05-03T11:51:36+5:30

GokulMilk Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाला दूध पुरवठा करणारे साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकरी असले तरी, मतदार मात्र ३५४७ आहेत. कारण दूध संस्थेच्या एका प्रतिनिधीलाच मतदानाचा अधिकार आहे. उद्या मंगळवारी (दि. ४) दुपारपर्यंत या संघाची सत्ता कोणाकडे जाणार, याचा फैसला होईल.

Queuing for Gokul 99. 78% turnout | गोकुळसाठी रांगा लावून ९९. ७८ टक्के मतदान, उद्या दुपारपर्यंत गुलाल

गोकुळसाठी रांगा लावून ९९. ७८ टक्के मतदान, उद्या दुपारपर्यंत गुलाल

googlenewsNext
ठळक मुद्देदोन्ही आघाड्यांकडून विजयाचा दावा सात तालुक्यांत १०० टक्के मतदान

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) रविवारी अत्यंत ईर्षेने रांगा लावून ९९.७८ टक्के मतदान झाले. करवीर, शिरोळ, गडहिंग्लज, पन्हाळा, चंदगड, कागल व हातकणंगले तालुक्यात १०० टक्के मतदान झाले. सत्तारूढ व विरोधी आघाडीने ठरावधारकांना एकत्रित आणत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक व विरोधी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

संघाला दूध पुरवठा करणारे साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकरी असले तरी, मतदार मात्र ३५४७ आहेत. कारण दूध संस्थेच्या एका प्रतिनिधीलाच मतदानाचा अधिकार आहे. उद्या मंगळवारी (दि. ४) दुपारपर्यंत या संघाची सत्ता कोणाकडे जाणार, याचा फैसला होईल.

सुमारे चोवीसशे कोटी रुपयांची उलाढाल, देशभरात नावाजलेला ब्रँड आणि जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या संसाराची घडी बसविणारा संघ, अशी गोकुळ दूध संघाची ओळख आहे. गेली पंचवीस वर्षे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महाडिक यांचे या संघावर राजकीय वर्चस्व आहे. त्यांना प्रथमच काँग्रेसचेच पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आव्हान दिले आहे. काँग्रेस-भाजप-शिवसेना विरुध्द महाविकास आघाडीसह भाजप असे लढतीचे चित्र आहे.

कर्जमाफी, कोरोनामुळे तब्बल सव्वा वर्ष गोकुळची निवडणूक लांबणीवर पडली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रक्रिया सुरू झाली, मात्र सत्तारूढ गटाच्यावतीने निवडणूक स्थगितीसाठी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. येथेही सुरक्षितता पाळून निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर रविवारी प्रक्रिया पार पडली.

जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या गोकुळच्या सत्तेसाठी साम, दाम, दंड सर्व नीतीचा वापर झाला. आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. संघाच्या कारभाराचा लेखाजोखा दोन्ही गटांकडून मांडण्यात आला. दोन्ही आघाड्यांकडून मतांसाठी अर्थकारण घडले. गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुमारे दोन हजार ठरावधारकांना अज्ञातस्थळी हलविले होते. कोरोनाबाधित मतदारांना पीपीई कीट घालूनच मतदानासाठी आणले होते. त्याशिवाय आजारी मतदारांना थेट केंद्रावर उचलून आणून मतदान करवून घेतले.
तालुकानिहाय झालेले मतदान असे

तालुका              एकूण मतदान           झालेले मतदान

  • गगनबावडा            ७६                        ७५
  • हातकणंगले           ९५                        ९५
  • शिरोळ                १३३                      १३३
  • राधानगरी             ४५८                    ४५७
  • गडहिंग्लज           २७२                    २७२
  • शाहूवाडी              २८६                     २८५
  • पन्हाळा               ३५३                    ३५३
  • आजरा                २३३                     २३२
  • करवीर                ६३९                     ६३९
  • भुदरगड             ३७३                      ३६९
  • चंदगड               ३४६                       ३४६
  • कागल                ३८३                      ३८३
  • एकूण                 ३६४७                   ३६३९


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली. कोठेही गर्दी अथवा इतर प्रकार घडला नाही.
- वैभव नावडकर,
निवडणूक निर्णय अधिकारी, गोकुळ


नावडकर यांचे नेटके नियोजन

कोरोनाचा वाढता संसर्ग, राजकीय इर्षा यामुळे निवडणुकीकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक शरद पाटील व डॉ. गजेंद्र देशमुख यांनी नेटके नियोजन केल्याने कोठेही वादावादी अथवा अनुचित प्रकार घडला नाही.

४९० कर्मचाऱ्यांकडून प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यातील ७० मतदान केंद्रावर ३५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. त्याशिवाय १४० पोलीस कर्मचारी होते. एकूण ४९० कर्मचाऱ्यांनी प्रक्रिया पुर्ण केली.

सोशल डिस्टन्सिंगची एैशी की तैशी

कोल्हापूरात रोज एक हजारापेक्षा अधिक कोरोना बाधित रूग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर ह्यगोकुळह्णची निवडणूक झाली, मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले असले तरी ठरावधारकांच्या शक्तिप्रदर्शनात सोशल डिस्टन्सिंगची एैशी की तैशी झाली होती.

बारा कोरोनाबाधित मतदार पीपीईकीटमध्ये

गोकुळचे बारा मतदार हे कोरोना बाधित असल्याने ते रुग्णालयात होते. त्यांना पीपीईकीट घालूनच मतदानासाठी आणले होते. त्याशिवाय आजारी मतदारांना थेट केंद्रावर उचलून आणून मतदान करून घेतले.

आणाभाका, दबावामुळे मतदार तणावाखाली

गोकुळच्या मागील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात फुटीर मतदान झाल्याने सत्तारूढ गटाला फटका बसला होता. त्यामुळे यावेळेला दोन्ही आघाड्यांकडून पॅनेल टू पॅनेलसाठी मतदानासाठी कंबर कसली होती. जागृत देवस्थानच्या शपथा, भंडारा उचलणे याबरोबरच राजकीय दबावही टाकण्यात आले. त्यामुळे मतदार काहीसे तणावाखाली दिसत होते.

Web Title: Queuing for Gokul 99. 78% turnout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.