विधान परिषदेच्या मैदानात मताधिक्य किती हीच उत्सुकता

By admin | Published: December 30, 2015 01:06 AM2015-12-30T01:06:43+5:302015-12-30T01:10:32+5:30

\सतेज यांचे पारडे जड : पाटील २२०, तर महाडिक १७० चा अंदाज, आज मतमोजणी

Quite the curiosity on the grounds of the Legislative Council | विधान परिषदेच्या मैदानात मताधिक्य किती हीच उत्सुकता

विधान परिषदेच्या मैदानात मताधिक्य किती हीच उत्सुकता

Next

कोल्हापूर : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे. फक्त ते किती मतांनी विजयी होणार याचीच लोकांना उत्सुकता आहे. आज, बुधवारी सकाळी आठ वाजता येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणी होत असून कोण निवडून येणार, या संबंधीच्या वृत्तपत्रांतील बातम्या वाचेपर्यंत विजयी उमेदवार गुलाल लावून मतमोजणी केंद्रातून बाहेर येणार आहे. पाटील व भाजपपुरस्कृत अपक्ष उमेदवार आमदार महादेवराव महाडिक यांच्यात ही लढत झाली आहे.
या निवडणुकीत सतेज पाटील यांनी २५० मतांचा दावा केला आहे; कारण तेवढे मतदार त्यांनी सहलीवर नेले होते. त्यातील जास्तीत जास्त वीस मतांबद्दल त्यांनाही साशंकता आहे. आमदार महाडिक यांनी १६२ मतदार आपल्यासोबत असल्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात त्यांच्याकडे १३२ ते १४० पर्यंतच मतदार होते, असे त्यांच्याशी निकटवर्तीयांचेच म्हणणे आहे. त्यामुळे जरी फंदफितुरी झाली तरी ते १६० ते १७० मतांच्या पुढे जात नाहीत. त्यामुळे सतेज यांचा सुमारे ५० ते ६० मतांनी विजय होईल, असा अंदाज मतदानानंतर जाणकारांतून व्यक्त झाला.
महाडिक निवडून यावेत यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वत:ही अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांना महाडिक यांना मतदान करण्याची गळ घातली; परंतु कोरे यांनी त्यास नकार देऊन सतेज पाटील यांना पाठिंबा दिला. खासदार राजू शेट्टी यांनाही मुख्यमंत्र्यांनी फोन करून महाडिक यांना पाठिंबा देण्यास भाग पाडले. सतेज पाटील यांचे
वडील माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनीही या निवडणुकीत बरीच मोर्चेबांधणी केली होती. (प्रतिनिधी)


अशी होणार मतमोजणी..
मतपेट्या शासकीय तंत्रनिकेतनमधील माहिती व तंत्रज्ञान इमारतीच्या स्ट्राँगरूममध्ये बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. आज, बुधवारी (दि. ३०) सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. मतमोजणी तीन टेबलांवर होणार असून, प्रत्येक टेबलावर एक मतमोजणी पर्यवेक्षक आणि दोन मतमोजणी सहायक अशा एकूण नऊ व राखीव तीन अशा एकूण बाराजणांची नियुक्ती केली आहे. सर्व केंद्रांवरील मतपत्रिका एकत्रित केल्या जातील. त्या मिसळल्यानंतर त्याचे प्रत्येकी २५ चे गठ्ठे केले जातील. साधारणत: हे सोळा गठ्ठे होतील. तीन टेबल्सवर ते मोजायला दिले जातील. म्हणजे मतमोजणीच्या पाच फेऱ्या होतील; परंतु तरीही ही प्रक्रिया सकाळी अकरा वाजेपर्यंत पूर्ण होईल, असा निवडणूक यंत्रणेचा अंदाज आहे.


प्रथमच एकमेकांशी झुंज
विधानसभेच्या २००४ च्या निवडणुकीत करवीर मतदारसंघातून निवडून येण्यासाठी सतेज पाटील यांना आमदार महाडिक यांची मदत झाली. त्यानंतर वर्चस्वाच्या राजकारणातून त्यांच्या वाटा वेगळ््या झाल्या. महापालिकेच्या २००९ च्या निवडणुकीतही हा संघर्ष होता. पुढे सतेज पाटील गृहराज्यमंत्री झाल्यावर त्यांनी त्रास दिल्याचा राग महाडिक यांना जास्त आहे. त्याच रागातून त्यांनी विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत मुलगा अमल यांना मैदानात उतरविले. महाडिक गटाची ताकद आणि भाजपच्या लाटेमुळे सतेज यांचा पराभव झाला. पुढे गोकुळ व राजाराम कारखान्यांतही या दोन नेत्यांत लढत झाली; परंतु तिथे दोन्हीकडे महाडिक यांनी आपला दबदबा कायम राखला. हे दोघे नेते थेट एकमेकांविरोधात कधीच रिंगणात उतरले नव्हते. त्यामुळेही ही लढत लक्षवेधी ठरली.

३१ डिसेंबरचा जल्लोष आजच...
यंदाचा ३१ डिसेंबर उद्या, गुरुवारी असला तरी विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्यादृष्टीने आज, बुधवारी निकाल लागल्यापासूनच ३१ डिसेंबरचा जल्लोष सुरू होणार आहे. अनेकांनी त्याची तयारीही केली आहे. काही उत्साही कार्यकर्त्यांनी तर अभिनंदनाचे डिजिटलही तयार केले आहेत. फटाके वाजायचे अवकाश, लगेच शहरभर हे फलक लागणार आहेत.

Web Title: Quite the curiosity on the grounds of the Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.