आर. सी. पाटील यांच्यामुळे एस. टी. फायद्यात
By admin | Published: December 30, 2014 11:47 PM2014-12-30T23:47:48+5:302014-12-31T00:11:38+5:30
पी. एन. पाटील यांचे गौरवोद्गार : सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
कोल्हापूर : परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक आर. सी. पाटील यांनी कर्मचारी, प्रवासी यांच्याशी चांगले संबंध ठेवत अनेक नवीन उपक्रम राबविले. त्यांच्या काळातच खऱ्या अर्थाने परिवहन महामंडळ फायद्यात आल्याचे गौरवोद्गार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी काढले.
आर. सी. पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील म्हणाले, आर. सी. पाटील यांनी एस. टी. महामंडळाच्या फायद्याच्या अनेक योजना राबविल्या. त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊनच परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती होईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही पी. एन. पाटील यांनी दिली. के. पी. पाटील म्हणाले, आर. सी. पाटील यांनी कर्मचाऱ्यांबरोबर प्रवाशांना न्याय देण्याचे काम केले. अलीकडील काळात एस. टी. समोर नवीन आव्हाने उभी आहेत, त्यातून मार्ग काढण्यासाठी आर. सी. पाटील यांच्यासारखी अनुभवी माणसे महामंडळावर असणे गरजेचे आहे.
मालोजीराजे छत्रपती म्हणाले, अधिकारी कसा असावा, हे आर. सी. पाटील यांच्या कर्तृत्वाकडे पाहिले की समजते. कर्मचारी, लोकप्रतिनिधी, प्रवासी यांची सांगड बांधून महामंडळाला ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. माझ्या सत्कारासाठी मंत्रिमहोदयही आले असते, पण त्यापेक्षा सहा कर्मचारी संघटना एकत्रित येऊन व ज्यांनी माझ्या आयुष्यात मदत केली त्यांच्या हस्ते झालेला सत्कार फार मोठा असल्याचे सांगत एस. टी. महामंडळाचे महाव्यवस्थापक आर. सी. पाटील म्हणाले, आजपर्यंत कर्मचाऱ्यांना समजावून घेऊन काम केले. एखाद्याला शिक्षा करत असताना त्याची समजूत काढून, त्याला चहा पाजून बडतर्फ केल्याने माझे ऋणानुबंध कायम राहिले.
आर. सी. पाटील व त्यांच्या पत्नी सुचित्रा पाटील यांचा सत्कार पी. एन. पाटील यांच्या हस्ते झाला. एस. टी. महामंडळाचे संचालक ए. वाय. पाटील, डी. बी. वारंग, श्री. ताटे आदींनी मनोगत व्यक्त केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील यांनी स्वागत केले. विभाग नियंत्रक सुहास जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.