आर. डी. पाटील यांना सीसीटीव्ही फुटेजने तारले

By admin | Published: October 14, 2015 01:00 AM2015-10-14T01:00:40+5:302015-10-14T01:04:19+5:30

साडेतीन तासांच्या युक्तिवादानंतर अर्ज स्वीकारला

R. D. Protected by CCTV footage | आर. डी. पाटील यांना सीसीटीव्ही फुटेजने तारले

आर. डी. पाटील यांना सीसीटीव्ही फुटेजने तारले

Next

कोल्हापूर : भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आर. डी. पाटील हे दुपारी तीननंतर म्हणजे अर्ज भरण्याच्या वेळेनंतर निवडणूक कार्यालयात आले आहेत, असा आक्षेप घेत त्यांचा अर्ज स्वीकारू नये, अशी हरकत विरोधी उमेदवारांनी घेतली. तब्बल साडेतीन तासांच्या युक्तिवादानंतर व ‘सीसीटीव्ही फुटेज’च्या आधारावर ते कार्यालयात उपस्थित असल्याचे सिद्ध झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज रात्री दहाच्या सुमारास दाखल करून घेतला. त्यामुळे पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला. तब्बल सात तास त्यांना प्रतीक्षा करावी लागली.
राजारामपुरी पोपटराव जगदाळे हॉल येथे अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी गर्दी झाली होती. शिवाजी उद्यमनगर प्रभागातून अर्ज भरण्यासाठी आलेल्या भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आर. डी. पाटील हे दुपारी दोनपूर्वीच निवडणूक कार्यालयात आले होते; परंतु प्रत्यक्षात ते अर्ज सादर करायला गेल्यावर त्यांना विरोधी उमेदवार सचिन पाटील, विशाल शिराळकर, दीपक स्वामी यांनी आक्षेप घेतला. ते अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर म्हणजे तीननंतर आल्याची हरकत घेत त्यांचा अर्ज अडवून ठेवला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. अर्ज भरण्याची धावपळ सुरू असल्याने ती पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हा विषय हातात घेतला. सायंकाळी सातनंतर या प्रक्रियेला सुरुवात झाली. विरोधी उमेदवारांचे वकील शिवप्रसाद वंदुरे-पाटील व प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद करत आर. डी. पाटील हे महालक्ष्मी प्रभागातील रहिवासी असल्याने हा प्रभाग ज्या गांधी मैदान निवडणूक कार्यालयाच्या क्षेत्रात येतो तेथील निवडणूक अधिकाऱ्यांकडून तेथील मतदार यादीत त्यांचे नाव असल्याचा दाखला दुपारी ३.२० वाजता दिला आहे. तो दाखला जोडल्याशिवाय अर्ज भरता येत नाही. त्यामुळे ते या ठिकाणी गेले होते. तेथून आल्यानंतर ही वेळ टळून गेली होती, त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारू नये, असे म्हटले. त्यावर आपली बाजू मांडताना आर. डी. पाटील यांनी मी इथून बाहेरच गेलेलो नाही. पाहिजे असेल तर सीसीटीव्ही फुटेज पाहा, असे सांगितले. तोपर्यंत राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रा. जयंत पाटील व माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे हे त्या ठिकाणी आले. त्यांनीही आक्षेप घेत अर्ज स्वीकारू नये, असे सांगून तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? अशी आक्रमक होत विचारणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केली. यावर ते म्हणाले, माझ्यावर कुणाचा दबाव नाही व मी कुणाचा दबाव घेत नाही.
हे पदाधिकारी गेल्यानंतर ताराराणी आघाडीचे निमंत्रक सुनील मोदी हे वकील राजेंद्र किंकर यांना घेऊन याठिकाणी आले. त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन तुम्ही अर्ज भरून घ्यायला हवा होता, असे सांगितले. काही वेळात भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा सरचिटणीस राहुल चिकोडे ही येथे आले. तोपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या वकिलांना बोलावून घेतले. ते आल्यानंतर त्यांच्याशी बराच वेळ चर्चा करून सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी करण्यात आली. यामध्ये दुपारी तीनपूर्वी आर. डी. पाटील हे कार्यालयात असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी रात्री दहाच्या सुमारास भरून घेतला. अर्जासंबंधी सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत युक्तिवाद सुरू होता. निर्णयासाठी सात तास त्यांना प्रतीक्षा करावी लागली. या प्रक्रियेवळी दोन्हीकडील नेते व कार्यकर्ते जमल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)
————————————————

दाखला फाडल्याची चर्चा
आर. डी. पाटील यांचे कार्यकर्ते गांधी मैदान निवडणूक कार्यालयातून प्रभागातील मतदार यादीतील नावाचा दाखला घेऊन जगदाळे हॉल येथील निवडणूक कार्यालय परिसरात आल्यावर त्यांना अडवून त्यांच्याकडून तो दाखला काढून घेत तो फाडला, अशी चर्चा उपस्थितांमधून होत होती.
————————
(बातमीदार : प्रवीण देसाई)

Web Title: R. D. Protected by CCTV footage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.