मुंबईतील होमी भाभा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी आर. के. कामत

By संतोष.मिठारी | Published: August 3, 2022 11:20 PM2022-08-03T23:20:07+5:302022-08-03T23:21:07+5:30

हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे; कामत यांची प्रतिक्रिया

R. K. Kamat Appointed as first Vice-Chancellor of Homi Bhabha University in Mumbai | मुंबईतील होमी भाभा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी आर. के. कामत

मुंबईतील होमी भाभा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी आर. के. कामत

Next

संतोष मिठारी, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. तथा रजनीश कमलाकर कामत यांची मुंबईतील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी बुधवारी नियुक्ती झाली. कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषित केली. उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या या विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा डॉ. कामत यांच्या माध्यमातून कोल्हापूरला बहुमान लाभला.

कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती यतींद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. पुणे येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. अनुपम शुक्ल आणि शासनाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. कामत यांची नियुक्ती केली. त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी आहे.

मूळचे कागल येथील असणारे डॉ. कामत हे शिवाजी विद्यापीठात इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गेल्या २५ वर्षांत त्यांनी शिवाजी विद्यापीठ, गोवा विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून उच्चशिक्षण क्षेत्रात योगदान दिले आहे. अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. त्यात शिवाजी विद्यापीठाच्या इनोव्हेशन अँड इनक्युबेशन लिन्केजिसचे संचालक, तंत्रज्ञान विभागाचे संचालक, इलेक्ट्रॉनिक्स तसेच संगणकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या करिअर कौन्सिलिंग कक्षाचे समन्वयक पदांचा समावेश आहे.

"डॉ. होमी भाभा राज्य समूह विद्यापीठाच्या कुलगुरुपदी झालेली निवड हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. शिवाजी विद्यापीठाचे माझ्या प्रगतीमध्ये बहुमोल योगदान आहे. त्यांचे स्मरण करून नवी जबाबदारी स्वीकारत आहे. उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात भरीव योगदान देण्यासाठी कुलगुरुपदाच्या कारकिर्दीत प्रयत्नशील राहीन", अशी प्रतिक्रिया डॉ. आर. के. कामत यांनी दिली.

Web Title: R. K. Kamat Appointed as first Vice-Chancellor of Homi Bhabha University in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.