आर. के. मेहता यांच्यासह चौघांवर गुन्हा
By admin | Published: June 15, 2015 12:38 AM2015-06-15T00:38:31+5:302015-06-15T00:42:52+5:30
फसवणूक प्रकरण : ६५ लाख रुपये घेऊन खोटा धनादेश दिल्याची फिर्याद
कोल्हापूर : निवासी संकुल विकसित करण्यासाठी घेतलेले ५० लाख रुपये परत न करता ६५ लाखांचा खोटा धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी संशयित राकेश मूलचंद मेहता व त्यांची मुलगी मंगलप्रभा डेव्हलपर्सच्या प्रार्थना मेहता, ठेकेदार प्रशांत प्रभाकर काटे, कारकून विष्णू बाळकृष्ण शेटे यांच्या विरोधात रविवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत अर्ज दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी सांगितले, फिर्यादी उमेश वसंतराव काशीकर (वय ६१, रा. गंगावेश) यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिलेल्या जबाबात म्हटले आहे, राकेश मेहता हे माझ्या ओळखीचे आहेत. त्यांनी डी वॉर्ड, गंगावेशजवळील जागा मुलगी मंगलप्रभा डेव्हलपर्सच्या प्रार्थना मेहता हिच्या नावावर खरेदी करून घेतली होती. त्या जागेत निवासी संकुल विकसित करण्यासाठी त्यांनी माझ्याकडून ५० लाख रुपये घेतले. त्या रकमेचा लेखी करार करण्यात आला; परंतु करार नाकारून झालेल्या नुकसानीपोटी १५ लाख रुपये देण्याचे मान्य करून ६५ लाख रुपयांचा धनादेश दिला.
त्याचबरोबर धनादेशाच्या हमीपोटी एक हजार चौरस फुटांचा बिल्टअप प्लॅट देतो, अशी खोटी हमी दिली आहे.
तरी संशयित आर. के. मेहता, त्यांची मुलगी प्रार्थना, ठेकेदार प्रशांत काटे व कारकून विष्णू शेटे यांनी आपली फसवणूक केली असून, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास व्हावा. दरम्यान, हा जबाब पोलीस उपनिरीक्षक ए. व्ही. मस्के यांनी घेतला आहे. या संदर्भात जुना राजवाडा पोलिसांकडे चौकशी केली असता रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले.
५६ लाखांच्या फसवणूक प्रकरणी संशयित आर. के. मेहता यांच्यासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- एस. व्ही. मस्के, तपासी अधिकारी