रब्बीचा हंगाम अंतिम टप्प्यात; कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी ९६ टक्के पेरण्या; 'या' तालुक्यात पेरा घटला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 12:08 PM2022-12-24T12:08:16+5:302022-12-24T12:08:37+5:30
राजाराम लोंढे कोल्हापूर : जिल्ह्यात रब्बीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, शाहूवाडी, हातकणंगले व कागल तालुक्यात रब्बीचा पेरा घटला आहे. ...
राजाराम लोंढे
कोल्हापूर : जिल्ह्यात रब्बीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, शाहूवाडी, हातकणंगले व कागल तालुक्यात रब्बीचा पेरा घटला आहे. शाहूवाडी तालुक्यातील केवळ ६४ टक्केच पेरण्या झाल्या असून, कागल ९२ टक्के तर हातकणंगले व भुदरगड तालुक्यात ९४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी पेर क्षेत्र वाढले असले, तरी अद्याप ९६ टक्केच पेरणी झालेली आहे.
यंदा परतीच्या पावसाने रब्बी हंगामातील ऑक्टोबर महिना वाया गेला. खरिपाची काढणी लांबल्याने, रब्बीचा हंगामही पुढे गेला. त्यामुळे पेरण्यांना उशीर झाला. साधारणत: डिसेंबरअखेर रब्बीच्या पेरण्या होतात. आतापर्यंत २१ हजार २५९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरणीचे प्रमाण कमी आहे. तालुकानिहाय सरासरी क्षेत्र पाहिले, तर शाहूवाडी, कागल, भुदरगड व हातकणंगले तालुक्यात पेरण्या कमी झाल्या.
सूर्यफुलाची केवळ १२ हेक्टरवरच पेरणी
एकीकडे गोडेतेलाच्या दरात वाढ होत असताना, सूर्यफुलाची लागवड कमी होत चालली आहे. सूर्यफुलाचे जिल्ह्यात १५७ हेक्टर क्षेत्र असताना, केवळ १२ हेक्टरवर फक्त शाहूवाडी तालुक्यात पेरणी झालेली आहे.
तालुकानिहाय रब्बीच्या पेरण्या, हेक्टरमध्ये
तालुका पेरणी टक्केवारी
शिरोळ ८६१ १२४
पन्हाळा २,२५८ १०५
राधानगरी ४८५ १०६
चंदगड २५६ ११४
गगनबावडा २६१ १०८
करवीर १,८२५ १०२
गडहिंग्लज ४,७६० १०१
आजरा १,३८१ १४१
भुदरगड २१२ ९४
हातकणंगले ५,७७५ ९४
कागल २,९७८ ९२
शाहूवाडी १,४८८ ६४
पीकनिहाय अशी झाली पेरणी, हेक्टरमध्ये
पीक सर्वसाधारण क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी
ज्वारी ११ हजार ७९३ ११ हजार ९३६
गहू १ हजार ७५६ १ हजार ४६९
मका २ हजार २२० १ हजार ८८३
हरभरा ४ हजार ७४६ ४ हजार ७२३
सूर्यफूल १५७ १२