एड्सपेक्षा रेबिज भयानक; दहा दिवसांत मृत्यू

By Admin | Published: June 23, 2016 01:47 AM2016-06-23T01:47:57+5:302016-06-23T01:48:39+5:30

औषध नाहीच : कुत्रा चावल्यानंतर प्रतिबंधात्मक लस घेणे हाच उपाय - मोकाट कुत्र्यांची दहशत ३

Rabies horrible from AIDS; Death in ten days | एड्सपेक्षा रेबिज भयानक; दहा दिवसांत मृत्यू

एड्सपेक्षा रेबिज भयानक; दहा दिवसांत मृत्यू

googlenewsNext

चंद्रकांत कित्तुरे -- कोल्हापूर --एचआयव्ही किंवा एड्स माणसाला हळूहळू मारतो त्यावरही कायमस्वरूपी औषध अद्याप सापडलेले नाही त्यामुळे त्याची लागण झाली की मृत्यू अटळच असतो. तरीही औषधांच्या साहाय्याने मृत्यू लांबविता येतो. एचआयव्हीग्रस्त दहा-वीस वर्षे जगल्याची उदाहरणे आहेत; मात्र रेबिजची लागण झालेला माणूस आठ-दहा दिवसांतच हे राम म्हणतो. त्यामुळे रेबिजची लागण होऊ नये यासाठी कुत्रा चावल्यानंतर तातडीने अँटीरेबिजची लस घेणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे.
मोकाट कुत्री पिसाळण्याचे प्रमाण पावसाळ्यात जास्त असते. तथापि, यंदा गेल्या महिन्याभरातच सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांत सव्वाशेहून अधिक माणसांचा पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यांचे लचके तोडले आहेत. पाळीव कुत्र्यांनी अथवा न पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी चावा घेण्याचे प्रमाणही काही कमी नाही. त्यामुळे पिसाळलेला असो वा नसो अ‍ॅँटीरेबिजचे डोस हे घ्यावेच लागतात. सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी हजारो लोकांना श्वानदंश होत असल्याचे आकडेवारी सांगते. त्यामुळे अ‍ॅँटीरेबिजच्या लसीकरणावर कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च
होतात.






हा खर्च टाळण्यासाठी मोकाट कुत्र्यांना आवर घालणे हाच एकमेव उपाय आहे. मात्र, त्याला आवर कसा घालायचा यावर एकवाक्यता नाही. कायद्यान्वये मोकाट कुत्र्यांना ठार मारण्याला बंदी आहे. प्राणीमित्र या कायद्याच्या अंमलबजावणीवर ठाम असतात; पण या कुत्र्यांचा ज्यांना फटका बसला आहे ते मात्र त्यांना मारून टाकावे, असे आग्रहाने म्हणत असतात. कुत्र्याचे निर्बिजीकरण करून त्यांची वाढती संख्या रोखणे हा सध्या अवलंबला जाणारा मार्ग आहे; पण तो नियमितपणे राबविला जात नाही. वन्य प्राणीवर्गात कुत्र्याचा समावेश करीत असाल तर त्यांचे नागरी वस्तीत काय काम. पकडा आणि सोडून द्या जंगलात, असेही काहीजण म्हणतात. प्रत्यक्षात मात्र यातले काहीच होताना दिसत नाही.


कुत्रा का पिसाळतोे?
रेबिज या विषाणूची लागण कुत्र्याला झाली की तो पिसाळतो. हे विषाणू हवेत असतात. याची लागण झाली की, कुत्र्याचे त्यांच्या मेंदूवरील नियंत्रण सुटते. तो बेभान होतो. दिसेल त्याला चावत सुटतो. त्याच्या लाळेत हे विषाणू असतात. त्यामुळे हा कुत्रा ज्याला चावला आहे त्यालाही हा रोग होऊ शकतो. त्यामुळे पिसाळलेला कुत्रा दिसला की त्याला ठार मारणे हाच त्यावर उपाय आहे.

मांजर, वटवाघूळ, कोल्हाही पिसाळतो
कुत्र्याप्रमाणेच रेबिजचा हा रोग मांजर, कोल्हा आणि वटवाघूळ यांनाही होतो. हा रोग झालेला प्राणी दुसऱ्या प्राण्याला चावला की त्याच्या लाळेतून रेबिजचे विषाणू शरीरात प्रवेश करतात. ते रक्तातून मेंदूपर्यंत पोहोचून त्यांचा मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम होतो. या विषाणूंचा अधिशयन (इनक्युबेशन) कालावधी १० दिवस ते सहा महिने असतो. लागण झालेला प्राणी १० दिवसांत मरतो. तत्पूर्वी, तो बेभान होऊन हल्ला करीत सुटतो.



श्वानदंश झालेल्या रुग्णांना द्याव्या लागणाऱ्या अँटीरेबिजच्या लसीकरणावर सीपीआर रुग्णालयाला दरवर्षी सुमारे ५० लाख रुपये खर्च करावे लागतात. ही रक्कम या रुग्णालयाला औषधासाठी मिळणाऱ्या रकमेच्या १७ ते १८ टक्के इतकी आहे.
- डॉ. जयप्रकाश रामानंद
अधिष्ठाता सीपीआर, कोल्हापूर.


वाचकांना आवाहन !
मोकाट कुत्र्यांचा हा प्रश्न खूपच गंभीर आहे. अनेकजण त्यांचे लक्ष्य बनले असतील. काय आहेत तुमचे अनुभव? काय करता येईल या कुत्र्यांना आवरण्यासाठी? लिहा आणि पाठवा आमच्याकडे. निवडक पत्रांना प्रसिध्दी देऊ.
आमचा पत्ता : लोकमत ,लोकमत भवन प्लॉट नं. डी-३७,४८ व ४८/१ शिरोली एमआयडीसी, पुणे-बंगलोर रोड, कोल्हापूर, ४१६१२२.इमेल- ‘ङ्म’ीि२‘@ॅें्र’.ूङ्मे

Web Title: Rabies horrible from AIDS; Death in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.