वारणानगर चोरीतील रवींद्र पाटीलला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:01 AM2017-08-10T00:01:13+5:302017-08-10T00:01:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनी चोरीप्रकरणी पोलिसांना हुलकावणी देणाºया संशयित पोलीस नाईकला बुधवारी दुपारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सीआयडीने सापळा रचून अटक केली. रवींद्र बाबूराव पाटील (वय ३५, रा. सिद्धनेर्ली, ता. कागल) असे त्याचे नाव आहे. त्याला आज, गुरुवारी पन्हाळा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
वारणानगर शिक्षक कॉलनीतील चोरीप्रकरणी पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे, हवालदार दीपक पाटील हे पोलीस कोठडीत आहेत. तिघेही तपासकामात सहकार्य करीत नसल्याने त्यांनी चोरीची रक्कम कोठे गुंतविली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या गुन्ह्यातील संशयित पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील व शंकर पाटील फरार होते. त्यांचा तपास सुरू असताना प्रभारी पोलीस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांना खबºयांकडून रवींद्र पाटील हा मध्यवर्ती बसस्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बुधवारी दुपारी सापळा लावून त्याला अटक केली. तेथून त्याला शनिवार पेठेतील सीआयडीच्या कार्यालयात आणले. नंतर त्याची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी केली. यावेळी त्याने प्रसारमाध्यमांपासून तोंड लपविण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्यातील संशयित कुलदीप कांबळे याला उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. त्याची मुदत आज, गुरुवारी संपते. या अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यासाठी सीआयडीचे एक अधिकारी मुंबईला रात्रीच रवाना झाले. त्याने शुक्रवारी सीआयडीच्या कार्यालयात येऊन हजेरी लावली. सहायक फौजदार शरद कुरळपकर याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या अर्जावर निर्णय झालेला नाही. या गुन्ह्यात एकूण नऊ आरोपी आहेत. त्यांपैकी चौघांना अटक झाली. अन्य चौघेजण कॉन्स्टेबल शंकर पाटील, कुरळपकर, कांबळे व मैनुद्दीन मुल्ला यांना अटक झालेली नाही. प्रवीण भास्कर-सावंत (रा. वासूद, जि. सांगोला) याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
चौकशीमुळे घनवटचा रक्तदाब वाढला
विश्वनाथ घनवट याच्याकडे सीआयडीचे अधिकारी कसून चौकशी करीत आहेत. त्याच्याकडून मिळणाºया माहितीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात आहे. बुधवारी प्रश्नांची सरबत्ती सुरू असताना अचानक त्याचा रक्तदाब वाढल्याने तो अस्वस्थ झाला. पोलिसांनी त्याला तत्काळ जवळच्या सीपीआर रुग्णालयात नेले. या ठिकाणी त्याच्यावर उपचार करून प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याची राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत रवानगी केली.