शर्यतीत लिंगनूरच्या ‘बैलगाड्या’ सुसाट
By Admin | Published: July 3, 2017 12:45 AM2017-07-03T00:45:24+5:302017-07-03T00:45:24+5:30
शर्यतीत लिंगनूरच्या ‘बैलगाड्या’ सुसाट
राम मगदूम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यात लिंगनूर नावाची दोन गावं आहेत. पहिलंलिंगनूर काा नूल आणि दुसरं लिंगनूर काा नेसरी. पहिल्या लिंगनूरला विस्तीर्ण असा माळ आहे म्हणून त्याला माळ लिंगनूर म्हणतात, तर दुसरे नेसरीच्या जवळ आहे म्हणून त्याला नेसरी लिंगनूर म्हणतात. ही झाली त्यांची भौगोलिक ओळख.
मात्र, माळ लिंगनूरच अधिक सुपरिचीत आहे. त्याला कारण म्हणजे गावकऱ्यांची ‘पैलवान’की, गोकुळचे ‘चिलिंग सेंटर’ आणि येथे तयार होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण लोखंडी बैलगाड्या. वजनाला हलक्या आणि दिसायला देखण्या असणाऱ्या येथील बैलगाड्यांना सीमाभागासह दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातही मोठी मागणी आहे. सांगली, रायबागपासून हुबळीपर्यंत ख्याती पोहोचलेल्या या बैलगाड्यांमुळेच नवी ओळख या गावाला मिळाली आहे.
सुरुवातीपासून पैलवानकी करणाऱ्यांची संख्या याठिकाणी अधिक आहे. शेती हाच प्रमुख व्यवसाय असला तरी या गावातील अल्प-भूधारक काही शेतमजुरांनी बांधकामावर मजुरी करायला सुरुवात केली. त्यातून काही मंडळी कुशल गवंडी म्हणून पुढे आली, तेव्हापासून गवंड्यांचे गाव म्हणूनही लिंगनूरला ओळखले जाते. गावच्या फोंड्या माळावर तीन दशकांपूर्वी ‘गोकुळ’चे पहिले चिलिंग सेंटर सुरू झाले. तेव्हापासून हे गाव जिल्ह्यात अधिक चर्चेत आले. दरम्यान, गजेंद्र बाबू लोहार यांनी लोखंडी बैलगाड्या बनवायला सुरुवात केली. त्यांच्यापाठोपाठ गावातील चार-पाच तरुणांनीही तोच व्यवसाय सुरू केला आहे.
नव्वदच्या दशकात कै. सत्याप्पा शंकर लोहार यांचे नातू गजेंद्र बाबू लोहार यांनी या व्यवसायात प्रवेश केला. तीन पिढ्यांची लोहारकी असूनही केवळ पारंपरिक व्यवसाय न करता त्याला आधुनिकतेची जोड देण्याच्या उद्देशाने त्यांनी लोखंडी बैलगाड्या तयार करण्याचे ठरविले. कोल्हापुरातील मामांच्या कारखान्यात जाऊन त्यांनी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्या गावातच लोखंडी बैलगाडी कारखाना सुरू केला.
घरच्या परिस्थितीमुळे कारखान्यासाठी लागणारी लेथ मशीन, ग्रायंडिंग व ड्रिलिंग मशीन विकत घेणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला केवळ वेल्डिंग मशीन घेतली. लोखंडी अँगल, पाईप, पट्ट्या, आदी साहित्य गडहिंग्लजहून आणायचे.
गिऱ्हाइकांच्या मागणीनुसार ते एक्सा ब्लेडने हातांनी कापायचे आणि आकार देण्यासाठी पुन्हा गडहिंग्लजला न्यायचे. त्यानंतर आपल्या कारखान्यात आणून ते जोडायचे. एवढी धावपळ होत असतानाही केवळ जिद्द व इच्छाशक्तीच्या जोरावर बैलगाड्या तयार करण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला.
संकेश्वरनंतर गडहिंग्लज तालुक्यातील त्यांचा पहिलाच कारखाना. शेतीकामासाठी उपयुक्त बैलगाड्यांबरोबरच कल्पकतेने शर्यतीसाठी उपयोगी ठरतील अशा घोडागाड्या व बैलगाड्याही तयार करायला त्यांनी सुरुवात केली. प्रारंभी आजूबाजूच्या गावांतील शेतकरी त्यांच्याकडून बैलगाड्या बनवून घेत असत.
त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण बैलगाड्यांना गडहिंग्लजसह हळूहळू आजरा, चंदगड, कागल व भुदरगड या तालुक्यांतील शेतकऱ्यांचीदेखील मागणी येऊ लागली. त्यानंतर गोकाक, रायबाग, विजापूर, सांगली, हुबळीपर्यंत त्यांच्या बैलगाड्या पोहोचल्या आहेत. शर्यतीच्या बैलगाड्यांची किंमत चार ते पाच हजार, तर शेतीकामांच्या बैलगाड्यांची किंमत १० ते १२ हजार इतकी आहे. बैलगाड्यांबरोबर लोखंडी कुरी, कोळपी व पाण्याचे हातगाडेही या ठिकाणी तयार करण्यात येतात.
‘लिंगनूर’ची क्रेझ कायम
कृषी क्षेत्रातदेखील आधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला आहे. जमिनीच्या नांगरणीपासून मळणीपर्यंत यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. त्यामुळे शेतीकामासाठी बैलजोडी बाळगणाऱ्यांची संख्या सध्या रोडावत चालली आहे.
त्याचाही फटका या व्यवसायाला बसला असला तरी बैलजोडी बाळगणाऱ्या शेतकऱ्यांची पसंती लाकडी बैलगाड्यांऐवजी लोखंडी बैलगाड्यांनाच आहे. त्यामुळे नवीन बैलगाड्या तयार करून घेण्यासाठी आणि जुन्या बैलगाड्यांच्या दुरुस्तीसाठी शेतकरी आवर्जून ‘लिंगनूर’लाच येतात. त्यामुळेच बदलत्या काळातही ‘लिंगनूर’च्या बैलगाड्यांची क्रेझ अजूनही कायम आहे.
शर्यतीत बैलगाडी बक्षीस
दरवर्षी दत्त जयंतीला गावात बैलगाडी शर्यती भरविल्या जात. त्यावेळी बाहेरगावाहून येणाऱ्या शर्यतशौकिनांना आपल्या लोखंडी बैलगाडीची माहिती कळावी म्हणून गजेंद्र लोहार हे सुरुवातीला काही वर्षे पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला स्वत: तयार केलेली बैलगाडी बक्षीस म्हणून देत असत. त्यापाठोपाठ रमेश लोहार व जयसिंग कुरळे यांनीही त्यांचा कित्ता गिरवला. कारागिरांच्या या अभिनव बक्षिसांमुळेच लिंगनूरच्या बैलगाड्यांची ख्याती सर्वदूर पोहोचली.
एका गावात
पाच कारखाने
गजेंद्र लोहार यांच्या कारखान्यात शिकून रमेश लोहार व अनिल पोवार यांनी, तर रमेश लोहार यांच्या कारखान्यात शिकलेल्या जयसिंग कुरळे व किसन चोथे यांनीही गावातच आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे लिंगनूरसारख्या छोट्या खेड्यातही लोखंडी बैलगाड्या बनविणारे पाच कारखाने आहेत.