दरोडेखोरांचा धुमाकूळ

By Admin | Published: July 29, 2016 01:04 AM2016-07-29T01:04:14+5:302016-07-29T01:13:42+5:30

लिंबेजळगाव : गंगापूर तालुक्यातील दिघी, काळेगाव शिवारात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून शेतकरी पती-पत्नी व मुलास कुऱ्हाड, कोयत्याने जखमी करून

Racket | दरोडेखोरांचा धुमाकूळ

दरोडेखोरांचा धुमाकूळ

googlenewsNext


लिंबेजळगाव : गंगापूर तालुक्यातील दिघी, काळेगाव शिवारात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून शेतकरी पती-पत्नी व मुलास कुऱ्हाड, कोयत्याने जखमी करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह १ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. गुरुवारी (दि.२८) मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास हा दरोडा पडला.
या घटनेमुळे दिघीसह शेतवस्तीवरील व परिसरातील गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याविषयी माहिती अशी की, दिघी- कनकोरी या रस्त्यावर (गट नं. १२४) दिघी शिवारात शेतकरी आसाराम गणपतराव भोरे हे शेतवस्तीवर घर करून राहतात. या कुटुंबात आसाराम भोरे (६५), त्यांची पत्नी सरूबाई भोरे (५५), मुलगा नंदू भोरे (३५), सून संगीता नंदू भोरे (३२) व लहान मुले विशाल व नारायण, असे सहा जण राहतात. विशाल आठवीत, तर नारायण हा गावातील शाळेत ६ व्या वर्गात शिकतो.
गुरुवारी मध्यरात्री ४ दरोडेखोरांनी खळ्याला पुढील बाजूने कुलूप असल्याने शेताच्या बाजूने येऊन घरात प्रवेश केला. घराचा दरवाजा लोटलेला होता. ‘निकालो पैसा, आवाज मत करो, नहीं तो बहुत मारेंगे,’ असे हिंदीत बोलत त्यांनी भोरे परिवारास धमकावले. घाबरलेल्या संगीता हिने कानातील टॉप्स, मणीमंगळसूत्र काढून दिले. दोन दरोडेखोर आत तर दोघे बाहेर होते, असे विशालने सांगितले.
घरात झोपलेल्या आसाराम भोरे यांनी शिव्या देत प्रतिकार केल्याने चवताळलेल्या एका दरोडेखोराने त्यांच्या पायावर कुऱ्हाडीचे घाव घालून कपाळ व तोंडावर मारले. त्यामुळे आसाराम भोरे यांना रक्तस्राव सुरू झाला व घरातील सर्वच घाबरले.
दरोडेखोरांनी मग दयामाया न दाखविता सरूबाई यांची कर्णफुले अक्षरश: ओरबाडून घेतल्याने त्यांच्या दोन्ही कानांना जखमा झाल्या. गळ्यातील पोत, कुडकं, सर, मणी ओढून घेतले. नंदू भोरे यालाही मारहाण करून घरातील कपाट व पेटीचे कुलूप तोडून रोख रक्कम घेतली. घाबरलेली विशाल व नारायण ही मुले मारू नका हो, अशी याचना करीत होती; पण दरोडेखोर ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी कुणालाही दयामाया दाखवली नाही.
सरूबाई यांनी शक्कल लढवली
शौचाच्या बहाण्याने बाहेर आलेल्या सरूबाईच्या ओरडण्याचा आवाज वाळूज परिसरातून रात्रपाळी करून कनकोरी, कोळघरकडे जाणाऱ्या कंपनीच्या कामगारांनी ऐकला. या कामगारांनी दिघी गावात जाऊन नागरिकांना ही बाब कळवली. शेतवस्तीकडे जमाव येताच दरोडेखोर पळाले.
घटनेची माहिती पोलीस पाटलांनी वाळूज पोलीस ठाण्याला कळवली. तोपर्यंत जखमी आसाराम भोरे, सरूबाई भोरे व नंदू भोरे यांना गावाचे रहिवासी संजय अण्णा पवार यांनी रमेश म्हसरूप यांच्या गाडीने घाटी शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त माणिक बाकरे, वाळूज पोलीस पाण्याचे निरीक्षक धनंजय येरुळे, रामेश्वर थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणी नंदू भोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे पुढील तपास करीत आहेत.
आसाराम भोरे यांच्या कानाजवळ, डोके, हात, डाव्या पायावर जखमा असून, त्यांच्यावर वॉर्ड नं. १८, तर सरूबाई भोरे यांच्यावर वॉर्ड नं. १२ मध्ये उपचार सुरू आहेत. नंदूचे ओठ तीक्ष्ण हत्याराने कापले असून उजवा हात मोडला आहे. त्याच्यावरही उपचार चालू आहेत .

Web Title: Racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.