‘माध्यमिक’कडून गैरकारभाराची पाठराखण
By admin | Published: January 18, 2016 12:16 AM2016-01-18T00:16:36+5:302016-01-18T00:44:39+5:30
‘पाकिटा’साठी काय पण : सहसंचालकांचा आदेश धाब्यावर, ‘शिव-पार्वती’च्या अध्यक्षांचा आरोप
भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर -येथील माध्यमिक शिक्षण विभागाकडून गैरकारभाराची पाठराखण केली जात आहे. पन्हाळा तालुक्यातील वेतवडेमधील शिव-पार्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र मुळीक यांनी हा आरोप केला आहे.
मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या कारभाराविरोधात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर शिक्षण सहसंचालक लक्ष्मीकांत पांडे यांनी मुळीक यांच्या तक्रारीवर त्वरित कार्यवाही करून अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यातर्फे पाठवावा, असा आदेश दिला. हा आदेशही शिक्षणाधिकारी शिंदे यांनी धाब्यावर बसविला, असा गंभीर आरोप मुळीक यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या एका प्रसिद्धीपत्रकातून केला आहे. ‘पाकिटासाठी कायपण’ केले जाते, असा आरोपही होत आहे.माध्यमिक शिक्षण विभागातील खाबूगिरीच्या कारभारासंबंधी ‘लोकमत’मध्ये सडतोड लिखाणाची मालिका आल्यानंतर अनेक तक्रारी पुढे येत आहेत. मुळीक यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिव-पार्वती शिक्षण प्रसारक मंडळाचा मी अध्यक्ष आहे. शाळेतील विद्यार्थिनीशी अनैतिक वर्तन केल्याने संस्थेने शाळेच्या मुख्याध्यापकास निलंबित केले. स्वतंत्र प्राधिकरण नेमून संबंधित मुख्याध्यापकाची चौकशी सुरू आहे. त्या मुख्याध्यापकाच्या रिक्त जागेवर प्रभारी मुख्याध्यापक म्हणून मान्यता द्यावी, असा संस्थेने ठराव केला. मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला. ४ एप्रिल २०१४ पासून त्या प्रस्तावास मान्यताही नाही आणि अमान्यताही दिली नाही. प्रभारी मुख्याध्यापकास मंजुरी देण्यास एक लाखाची मागणी केली. त्याची तक्रार ‘लाचलुचपत’कडे केल्याचे कळताच अधिकारी कार्यालयाकडे फिरकल्या नाहीत.
शिक्षणातील ‘चोर बाजार’
उपोषणानंतर प्रशासनास जाग
पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषण केल्यानंतर आपल्या संस्थेची कार्यकारिणी मान्य केली. २०१४ पासूनचे निलंबित मुख्याध्यापकाने घेतलेले अतिरिक्त ४ लाख ६५ हजार रुपये वसूल करण्याची मागणीही ग्राह्य धरली. तक्रारीसंबंधीचा अहवाल आणि केलेली कार्यवाही यांची लेखी माहिती ३० नोव्हेंबर २०१५ पूर्वी देण्याचे आदेश आहेत. तरीही चौकशी अहवाल पाठवीत नाहीत, असेही मुळीक म्हणाले.