कोल्हापूर जिल्ह्यातील ३५ सावकार पोलिसांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:01 AM2018-11-19T00:01:51+5:302018-11-19T00:02:11+5:30
कोल्हापूर : पाच ते दहा टक्के व्याजाने सावकारकी करणाऱ्या ३५ जणांविरोधात पोलिसांत अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची सखोल ...
कोल्हापूर : पाच ते दहा टक्के व्याजाने सावकारकी करणाऱ्या ३५ जणांविरोधात पोलिसांत अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची सखोल चौकशी सुरू असून, काही सावकार ‘पैसे नकोत; पण गुन्हा दाखल करू नका,’ अशी विनंती करीत आहेत. जिल्ह्यातील गल्ली-बोळांत खासगी सावकारकी फोफावली आहे. सावकारांच्या मनमानी व्याजात गोरगरिबांची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.
शहरासह ग्रामीण भागात बेकायदेशीर खासगी सावकारांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दर शनिवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिनाचे आयोजित केल्याने जिल्ह्यातून ३५ सावकारांच्या विरोधात अर्ज दाखल झाले आहेत. ज्या-त्या पोलीस ठाण्यात अर्जांची कसून चौकशी सुरू आहे. महिन्याभरात दाखल झालेल्या अर्जांवरून सावकारकीचा फास संपूर्ण जिल्ह्याभोवती आवळत असल्याचे भयावह चित्र आहे. खासगी सावकारांकडून गरीब, गरजू लोकांना मुलीचे लग्न, शिक्षण, घरबांधणीसह अन्य कारणांसाठी हजारो रुपयांचे कर्ज दिले जात आहे. सुरुवातीस कर्ज परत करण्यासाठी तगादा लावला जात नाही; परंतु त्यानंतर त्यांना व्याजासह मुद्दल देण्यासाठी सतावून सोडले जाते.
या सावकारांविरोधात पोलीस ठाण्यापर्यंत तक्रार देण्याचे धाडस कोणी करीत नाहीत. सावकारांच्या त्रासाला कंटाळून अनेकांनी आपले जीवनही संपविले आहे.
राजकीय लोकप्रतिनिधी आणि शासकीय नोकरदार वर्ग सावकारकीमध्ये अग्रेसर आहे. पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीने काही सावकारांच्या पायांखालची वाळू सरकली आहे. विक्रमनगर परिसरातील एका सावकाराने दहा टक्के व्याजाने पैसे देऊन कागल येथील तरुणाला वेठीस धरले आहे. त्याच्याही अर्जाची राजारामपुरी पोलिसांत चौकशी सुरू आहे.
जादा व्याजदराने कर्ज
गरीब लोकांच्या मजबुरीचा फायदा घेत या सावकारांनी अनेकांची घरे, जमिनी व वाहने हडप केली आहेत. दरमहा १० ते २५ टक्के व्याजदराने ते कर्ज पुरवितात. त्यामुळे मूळ कर्जापेक्षा त्याचे व्याजच देताना कर्जदार पुन्हा कर्जाच्या खाईत सापडतो. ही वसुली करण्यासाठी सावकारांनी काही गुंड पोसले आहेत. त्यांच्याकडून कर्जदारांना वेळप्रसंगी दमदाटी व मारहाणही केली जाते.