राधानगरी-निपाणी राज्यमार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

By admin | Published: May 15, 2015 09:45 PM2015-05-15T21:45:03+5:302015-05-15T23:37:58+5:30

वाहतुकीसाठी धोकादायक : साडेचार वर्षांत ३२ जण ठार, तर १३६ जण जखमी; दिशादर्शक फलक, संरक्षक कठडे नाहीत

Radha-Nagani roadway is the trap of death | राधानगरी-निपाणी राज्यमार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

राधानगरी-निपाणी राज्यमार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

Next

रमेश वारके -बोरवडे- राधानगरी-निपाणी हा राज्यमार्ग वाहतुकीच्यादृष्टीने धोकादायक बनत आहे. या रस्त्यावरील अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असून, गेल्या साडेचार वर्षांपासून एप्रिल २०१५ अखेर झालेल्या अपघातात ३२ जण ठार झाले आहेत, तर १३६ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३१ पुरुष आणि एका स्त्रीचा समावेश असून, जखमींमध्ये १२१ पुरुष, १० स्त्रिया व पाच लहान मुलांचा समावेश आहे. त्यामुळे राधानगरी-निपाणी हा राज्यमार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
राधानगरी-निपाणी हा राज्यमार्ग नेहमीच वाहतुकीच्यादृष्टीने गजबजलेला आहे. या मार्गावरून प्रवास करताना प्रवासीवर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. किंबहुना, पादचारी लोकांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. कोकणातून फोंडाघाटमार्गे राधानगरी-निपाणी मार्गावरून बेळगावकडे जाणारी वाहनेही मोठ्या संख्येने आहेत.
या मार्गावर झालेल्या अपघातांची कारणे वेगवेगळी आहेत. भरधाव वेगाने होणारी बॉक्साईटची जीवघेणी वाहतूक, मर्यादेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक, तीव्र वळणे, या वळणावर नसलेले दिशादर्शक फलक, अनेक मोहऱ्यांवरती नसलेले संरक्षक कठडे, चालकांचे चाललेले मोबाईलवरील संभाषण, अशी अनेक कारणे अपघातास कारणीभूत ठरली आहेत. अनेक अपघातात बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या ट्रकवर ताडपद्री नसल्याने डोळ्यांत कण जाऊन डोळ्यांना जखमा झाल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील अपघात टाळायचे असतील, तर सार्वजनिक बांधकाम विभागाबरोबरच वाहतूक विभागानेही काटेकोरपणे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. या मार्गावर वाहने इतकी वेगात असतात की, प्रवासी वर्गाला प्रवास करताना फार मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकी वाहनांचा वेगही मोठ्या प्रमाणात असून, वळणावरून जाताना अंदाज न आल्याने अपघात होणे, त्याचबरोबर ओव्हरटेक करतानाही चालकांनी काळजी न घेतल्याने अपघात झाल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे.
या मार्गावर २०११ मध्ये मुरगूड पोलीस ठाण्यात २९ अपघातांची नोंद झाली असून, यामध्ये ट्रक-ट्रॅक्टर अपघातात चार पुरुष, मोटारसायकल-चारचाकी अपघातात एक पुरुष व एका स्त्रीचा मृत्यू झाला आहे . तर ३६ पुरुष, दोन स्त्रिया व एक लहान मुलगा जखमी झाला आहे. २०१२ मध्ये ३८ अपघातांची नोंद झाली असून, यामध्ये ट्रक-ट्रॅक्टरच्या अपघातात तीन, तर दुचाकी व चारचाकी अपघातात आठ पुरुष मृत झाले आहेत. तर २५ पुरुष व एका स्त्रिचा जखमींमध्ये समावेश आहे.
२०१३ मध्ये ४२ अपघातांची नोंद झाली असून, ट्रक-ट्रॅक्टरच्या अपघातात दोन, तर दुचाकी व चारचाकी अपघातात चार पुरुषांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३८ पुरुष, तीन स्त्रिया, तीन लहान मुले जखमी झाली आहेत. २०१४ मध्ये २२ अपघातांची नोंद झाली असून, ट्रक-ट्रॅक्टरच्या अपघातात दोन, तर दुचाकी-चारचाकी अपघातात सहा पुरुषांचा मृत्यू झाला असून, जखमींमध्ये १२ पुरुष, दोन महिला व एका मुलाचा समावेश आहे. एप्रिल २०१५ पर्यंत आठ अपघातांची नोंद झाली असून, दुचाकी अपघातात एक पुरुष मृत झाला असून, दोन पुरुष व एका स्त्रीचा जखमींमध्ये समावेश आहे.


वाहन चालवित असताना चालक मोबाईलवर बोलण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. वळणावर व पुढेही वाहन चालवित असताना वेगावर नियंत्रण ठेवावे. लहान मुलांच्या हाती गाड्या देऊ नयेत.
- तुकाराम सूर्यवंशी,
वाहतूक पोलीस नियंत्रक


या मार्गावर अनेक वळणे असून, वाहनांचा वेग जास्त असतो. त्यामुळे वळणावर ओव्हरटेक करण्याचे प्रमाण खूप असल्याने अपघात होतात. जीव धोक्यात घालून येथे प्रवास करावा लागत आहे. चालकांनी वाहन नियंत्रित चालवून अपघात टाळावेत.
- एम. आर. फराकटे,
स्थानिक रहिवाशी

Web Title: Radha-Nagani roadway is the trap of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.