बसस्थानक अन् मार्गही बदला : राधाकृष्णन बी.
By admin | Published: May 19, 2015 10:15 PM2015-05-19T22:15:48+5:302015-05-20T00:14:59+5:30
वाहतूक कोंडीवर ‘गावाला वळसा’-- रस्ता सुरक्षा समिती बैठकीत प्रशासनाला सूचना
रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात विनाअपघात व सुरळीत वाहतुकीबरोबरच वाहतुकीचे नियम पाळले जावेत. रत्नागिरी बाजारपेठेत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून एस. टी.च्या ग्रामीण बसेससाठी रहाटाघर स्थानक करून या बसेस मिऱ्या-कोल्हापूर महामार्गाने नेण्यात याव्यात, असा अजब पर्याय जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सुचवला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंंदे, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे, एस. टी.चे विभाग नियंत्रक के. एस. देशमुख, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मारुती खोडके, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे एस. आर. देसाई उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. रत्नागिरी शहरातील रस्ता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली अतिक्रमणे हटवावीत. त्याचबरोबर मुख्य रस्त्यावरील पार्किगचा प्रश्न सोडविण्यासाठी सम-विषम तारखेला पार्किंगचा पर्याय अवलंबवावा. एक दिशा मार्गाबाबत आवश्यक सूचना फलक लावण्यात यावेत. अंतर्गत रस्ते मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या ठिकाणी असणारे रिक्षा थांबे काही अंतरावर स्थलांतरित करुन वाहतुकीची होणारी कोंडी व अपघात टाळावेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘नो आॅटो झोन’ जाहीर करावा, शहरातील आठवडा बाजारामुळे वाहतुकीची कोंडी होत असेल तर बाजार शिस्तबद्ध पद्धतीने भरविण्यासाठी नगरपरिषद आणि पोलीस यांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. एस. टी. महामंडळाच्या बसेसमुळे एस. टी. आगारातून बसेस बाहेर पडताना होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील पर्यायी बसस्थानकाचा वापर करावा आणि बसेस मिऱ्या-कोल्हापूर महामार्गाने न्याव्यात, असे सांगतानाच गोगटे जोगळेकर महाविद्यालय रस्त्यावर होणारी बेशिस्त पार्किग रोखण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वाहतूक कोंडीवर ‘गावाला वळसा’
रोगापेक्षा इलाज भयंकर : बसेस गावाबाहेरून नेण्याचा अजब पर्याय
रत्नागिरी : एस. टी. महामंडळाच्या बसेसमुळे आगारातून बसेस बाहेर पडताना होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील पर्यायी म्हणजेच रहाटाघर येथील बसस्थानकाचा वापर करून मिऱ्या कोल्हापूर महामार्गावरून बाहेर काढण्याचा अजब पर्याय जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सुचवला आहे. हा पर्याय म्हणजे ‘गावाला वळसा’ ठरणार आहे. प्रवाशी, व एस. टी. दोहोंनाही याचा भुर्दंड बसणार आहे.
ग्रामीण भागातील व लांब पल्ल्याच्या गाड्या रहाटाघर बसस्थानक येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरी बसस्थानक मात्र नियोजित ठिकाणी रहाणार आहे. वास्तविक मध्यवर्ती ठिकाणी हायटेक बसस्थानक मंजूर झाले आहे. १७ कोटीचा आराखडा असलेले बीओटी तत्वारील बसस्थानकाचे भूमिपूजन झाले आहे. आठ महिने लोटले तरी बांधकाम मात्र रखडले आहे. असे असताना बसस्थानक हलविण्याचा अजब पर्याय जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवला आहे.
रहाटाघर बसस्थानक मध्यवर्ती बसस्थानकापासून लांब आहे. शिवाय येथून ग्रामीण व लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्याच्या सूचनेबरोबर मार्ग बदलण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रहाटाघर बसस्थानकातून बाहेर पडलेली बस मिऱ्या कोल्हापूर महामार्गावरून बाहेर काढण्याचा पर्याय जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी आयोजित बैठकीत सुचवला आहे. यामुळे रत्नागिरी शहरातील जयस्तंभ, माळनाका, मारूती मंदिर, शिवाजीनगर येथे कामासाठी आलेल्या प्रवाशांना बसमध्ये बसण्यासाठी साळवीस्टॉप येथे किंवा रहाटाघर येथे यावे लागणार आहे. तेथे पोहोचण्यासाठी रिक्षाला अनावश्यक पैसे मोजावे लागणार आहेत.
शहरातील शाळा, महाविद्यालयात येणारे विद्यार्थी असो व नोकरदार मंडळी यांनाही गावाकडे जाण्यासाठी अधिकचा भुर्दंड पडणार आहे. शिवाय कोतवडे किंवा आरेवारे मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रहाटाघर किंवा परटवणे स्टॉप गाठावा लागणार आहे. एकूणच प्रवाशांना बसस्थानक हलविल्यास नाहक भुर्दंड बसणार आहे.
बसस्थानक स्थलांतराबरोबर मार्ग बदलण्याचा निर्णय गोरगरीबांना खर्चिक आहे. प्रवासी भारमान कमी
झाले तर त्याचा परिणाम एस. टी.च्या उत्पनावरही होऊ शकतो. याआधी तसा परिणाम झालेलाही आहे. म्हणूनच रहाटाघरऐवजी गाड्या पुन्हा मूळ स्थानकातून सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. (प्रतिनिधी)