Radhanagari Dam: राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे डागडुजीसाठी खुले, ७० वर्षे पूर्ण होऊनदेखील दरवाजे सुस्थितीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 12:02 PM2022-03-31T12:02:32+5:302022-03-31T12:08:47+5:30
ब्रिटिशकालीन सातही दरवाज्याच्या आतील बाजूच्या लोखंडी अँगलना गंज चढला असून, धरण सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंचलित दरवाजाचे हे काम अत्यंत आवश्यक असल्याने हाती घेण्यात आले आहे.
गौरव सांगावकर
राधानगरी : राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या राधानगरीधरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे ७० वर्षे पूर्ण होऊनदेखील आजही व्यवस्थित उघडझाप करतात. पण वर्षातील ६ ते ७ महिने हे दरवाजे पाण्यात असतात. त्यामुळे ब्रिटिशकालीन सातही दरवाज्याच्या आतील बाजूच्या लोखंडी अँगलना गंज चढला असून, धरण सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंचलित दरवाजाचे हे काम अत्यंत आवश्यक असल्याने हाती घेण्यात आले आहे.
दरवर्षी थोड्याफार प्रमाणात मार्च- एप्रिलमध्ये पाणी कमी झाल्यानंतर दरवाजांना ग्रीसिंग ऑइलिंग अशी किरकोळ रिपेअरी केली जाते. पण धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच सातही दरवाजे खोलण्यात आले आहेत. गेट लिफ्टिंग, क्लिनिंग नवीन रबर सील, अँगलला पेंटिंग कोट ही कामे युद्धपातळीवर चालू आहेत.
कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर पाटबंधारे विभाग कोल्हापूर यांनी कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. एप्रिलअखेर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी (राधानगरी धरण) प्रवीण पारकर, शाखा अभियंता समीर नीरूखे उपस्थित होते.सातगेटचे काम हातात घेतले असले तरी पूर नियंत्रणासाठी पाच गेटचे काम करणे गरजेचे आहे.
सर्व दरवाजांचे परिचरण योग्य पद्धतीने झाल्यानंतर धरणाच्या सेवा धोरणावर अतिरिक्त भार येणार नाही त्यामुळे पूर नियंत्रण करणे अधिक सोपे जाईल. - प्रवीण पारकर, उपविभागीय अधिकारी, राधानगरी धरण