‘राधानगरी’चे दरवाजे खुले

By Admin | Published: August 4, 2016 01:05 AM2016-08-04T01:05:46+5:302016-08-04T01:22:32+5:30

पंचगंगा इशारा पातळीकडे : शिवाजी पूल वाहतुकीस बंद

'Radhanagari' doors open | ‘राधानगरी’चे दरवाजे खुले

‘राधानगरी’चे दरवाजे खुले

googlenewsNext

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले असून,
९००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून रात्री इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मच्छिंद्री झाल्यावर पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात
येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी
डॉ. अमित सैनी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. पावसाचा जोर असला तरी परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाड येथील पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील जपावसाची सुरू असलेली संततधार पाहता नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व परिस्थितीचा दिवसभर आढावा घेऊन संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून पाहणीही केली. त्यानंतर त्यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी सैनी म्हणाले,राधानगरी धरणातून होणारा सध्याचा विसर्ग पाहता रात्रीच (बुधवार) हा पूल वाहतुकीसाठी बंद करून पोलिस बंदोबस्त ठेवला जाईल. हा रस्ता बंद झाल्यावर वाहतूक शियेसह अन्य पर्यायी मार्गांवरून वळविण्यात येणार आहे. दुपारी शिवाजी पूल येथे जाऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, पोलिस अधीक्षक व प्रांताधिकारी यांच्या पथकाने पाहणी केली आहे.
पूरपरिस्थितीची शक्यता गृहीत धरून शहरातील पाण्याखाली जाणाऱ्या ठिकाणांची पुन्हा एकदा महापालिका आयुक्तांच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली आहे. पावसाचा जोर वाढत असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्राशेजारी जाऊ नये, पाणी आलेल्या रस्त्यांवरून जाण्याची चूक करू नये, पाण्यात उतरून मोबाईलवरून फोटो व सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नये. ज्या गावात स्थलांतर करण्याची आवश्यकता आहे, त्यानुसार ते करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसाचा जोर असला तरी परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. असे असले तरी प्रशासन सर्व बाजूंनी सज्ज आहे.
यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे उपस्थित होते.
------------------
यंत्रणा सज्ज; आठ नवीन बोटी
परिस्थिती नियंत्रणात असली तरी प्रशासन सज्ज आहे. ‘कन्यागत’ सोहळ्यासाठी आठ नवीन बोटी आल्या आहेत. त्यांचा वापर संभाव्य पूरपरिस्थितीसाठी करून घेतला जाणार आहे. सध्या प्रशासनाकडे दहा बोटी आहेत. त्यातील पाच बोटी शिरोळ येथे, दोन जिल्हाधिकारी कार्यालयात, दोन महापालिका व एक गडहिंग्लज नगरपरिषद येथे आहेत. २०० लाईफ जॅकेट्स उपलब्ध आहेत.
पाणीपातळी कमी झाल्यावर पुलांची पाहणी
महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुलांचा विषय ऐरणीवर आला आहे. सद्य:स्थितीला पाणीपातळी वाढल्याने पुलांची स्थिती सखोलपणे पाहणे अशक्य आहे. त्यामुळे पातळी कमी झाल्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत अहवाल येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: 'Radhanagari' doors open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.