राधानगरीतील प्रमुख शासकीय इमारती वापराविना पडून

By admin | Published: April 16, 2015 10:27 PM2015-04-16T22:27:41+5:302015-04-17T00:06:56+5:30

रुग्णालय कर्मचारी निवासस्थानास वीज, पाणी नाही : पोलीस ठाणे, महसूल भवन, न्यायाधीश निवासस्थान या इमारतींचा वापर नाहीच

Radhanagari main government building without use | राधानगरीतील प्रमुख शासकीय इमारती वापराविना पडून

राधानगरीतील प्रमुख शासकीय इमारती वापराविना पडून

Next

संजय पारकर - राधानगरी -येथे शासनाच्या अनेक इमारती वापराविना पडून आहेत. पोलीस ठाणे, महसूल भवन, न्यायाधीश निवासस्थान या इमारती वापराविनाच आहेत, तर नव्याने बांधलेली ग्रामीण रुग्णालय कर्मचारी निवासस्थान ही दोन कोटींची इमारत वीज व पाणी जोडणी नसल्यामुळे सहा महिन्यांपासून वापराच्या प्रतीक्षेत आहे.
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रुग्णालयाजवळच राहणे आवश्यक असते. येथे या निवासस्थानासाठी अपुरी जागा असल्याने अपार्टमेंट पद्धतीने दहा सदनिका बांधल्या आहेत. यासाठी दोन कोटी रुपये खर्च झाले आहेत. इमारत पूर्ण होऊन सहा महिने झाले. विद्युतीकरणासाठी अंतर्गत कामे पूर्ण करून महावितरणकडे जोडणीसाठी मागणी केली आहे. मात्र, वीज मीटर नसल्याचे कारण सांगत त्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. शिवाय ग्रामपंचायतीकडून पाण्याची जोडणीही अजून झालेली नाही. परिणामी इमारतीत राहणे कर्मचाऱ्यांना अशक्य आहे. मागील सरकारच्या काळात तालुकास्तरीय पोलीस ठाण्यासाठी नवीन प्रशस्त इमारत बांधण्याची घोषणा झाली. या योजनेतून इथे बांधलेली इमारत फारच लहान आहे. तेथे केवळ तीन ते चारच खोल्या असल्याने त्याचा काहीच उपयोग नाही. एक कोटीची गरज असताना केवळ पंधरा लाख मिळाल्याने एवढ्यातच ही इमारत बांधली. दोन वर्षांपासून ती वापराविना व देखभालीशिवाय पडून आहे. काही काळाने ती भग्न होण्याची भीती आहे. याच परिसरात असणाऱ्या पोलीस वसाहतीत तर प्रचंड दुरवस्था असल्याने इमारती भग्न झाल्या आहेत.
न्यायाधीश निवासस्थानासाठी जुनी इमारत सुस्थितीत असतानाही शेजारीच नवीन इमारत बांधण्यात आली आहे. सध्यातरी दोन्ही इमारती रिकाम्याच आहेत. महसूल विभागाची येथील बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी जुनी इमारत होती. पंधरा वर्षांपूर्वी महसूल कल्याण निधीतून तेथे प्रशस्त नवीन इमारत बांधली. काही वर्षे ती शाहू आरोग्य केंद्रासाठी भाड्याने दिली होती. दोन वर्षांपासून तीसुद्धा कुलूपबंद स्थितीत आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयासाठी ती राखीव ठेवल्याचे सांगितले जात होते; पण हे कार्यालय बारगळले. परिणामी इमारत वापराविना पडून आहे.
पंचायत समिती आवारात पाच-सहा वर्षांपूर्वीं सुमारे दहा लाख रुपये खर्चून बचत गटासाठी विक्री केंद्र इमारत बांधली. एक दिवसही या इमारतीचा वापर झालेला नाही. आता तिची पडझड झाल्याने तिची भग्न अवस्था होत आहे. येथील कर्मचारी निवासस्थानही दुरुस्तीअभावी मोडकळीस आले आहे. त्याचाही
वापर बंद झाला आहे. वन्यजीव विभागाचे कार्यालय हत्तीमहल येथे स्थलांतरित झाल्यावर तेथे कर्मचारी निवासस्थान बांधण्यात आले. काही काळ त्याचा वापर झाला; पण ते निर्मनुष्य ठिकाण असल्याने आता त्याचा वापर नाही.

Web Title: Radhanagari main government building without use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.