corona virus-राधानगरी, सागरेश्वर अभयारण्य मार्चअखेर राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 02:41 PM2020-03-16T14:41:27+5:302020-03-16T14:43:10+5:30
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राधानगरी आणि सागरेश्वर हे दोन्ही अभयारण्ये मार्चअखेर बंद ठेवण्याचा निर्णय वनखात्याने घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना वन्यजीवचे विभागीय वनअधिकारी विजय खेडकर यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
कोल्हापूर : राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राधानगरी आणि सागरेश्वर हे दोन्ही अभयारण्ये मार्चअखेर बंद ठेवण्याचा निर्णय वनखात्याने घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना वन्यजीवचे विभागीय वनअधिकारी विजय खेडकर यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी काढलेल्या आदेशानसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १३ मार्च रोजी लागू झालेल्या साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार दि. ३१ मार्च अखेर पर्यटन केंद्रही बंद ठेवण्याचे आदेश जारी केल्यामुळे राधानगरी आणि सागरेश्वर हे दोन्ही अभयारण्ये दि. १७ मार्चपासून ३१ मार्चअखेर बंद ठेवण्यात येणार आहेत.
कोल्हापूर वन्यजीव विभागाचे विभागीय वनअधिकारी विजय खेडकर यांनी यासंदर्भात वनविभागाच्या सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या वनपरिक्षेत्रातील परिमंडळ क्षेत्रात राहून जंगल हद्दीत कोणताही पर्यटक पर्यटनासाठी येणार नाही, याची दक्षता घ्यावी असे कळविले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पर्यटकांनीही अभयारण्यास भेट देण्याचे टाळावे, असे आवाहन विजय खेडकर यांनी केले आहे.